पणजी- गोवा विधानसभा निवडणुकीत उभे राहिलेल्या ३०१ उमेदवारांपैकी सुमारे ६२ टक्के म्हणजे १८७ उमेदवार हे करोडपती आहेत २०१७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत २५१ पैकी १५६ उमेदवार म्हणजेच त्यावेळीही ६२ टक्के उमेदवार करोडपती होते.
संपत्तीनिहाय उमेदवारांची आकडेवारी
गोवा विधानसभा निवडणुकीत ३०१ उमेदवारांपैकी ३१ टक्के म्हणजे ९३ उमेदवार पाच कोटी पेक्षा अधिक संपत्ती धारण करतात. दोन ते पाच कोटींमध्ये संपत्ती असलेल्या उमेदवारांची संख्या ४८ म्हणजे सोळा टक्के इतकी आहे. ५० लाख ते दोन कोटींपर्यंत ६५ उमेदवारांची संख्या असून ही २३ टक्के इतकी आहे. १० लाख ते ५० लाख दरम्यान सात उमेदवारांनी आपली संपत्ती जाहीर केली असून हे प्रमाण २० टक्के इतके आहे. तर दहा लाखांपेक्षा कमी संपत्ती असलेले ३५ उमेदवार असून हे प्रमाण अकरा टक्के इतके आहे.
पक्षनिहाय करोडपती उमेदवार
निवडणुकांमध्ये जिंकून येण्याची क्षमता या निकषावर उमेदवारांना पक्षांकडून तिकिटे दिली जातात. मात्र यामध्ये उमेदवाराची आर्थिक कुवत हा महत्त्वाचा निकष असतो. त्यामुळे केवळ जनसंपर्क असलेल्या नव्हे तर आर्थिक दृष्ट्या संपन्न असलेल्या उमेदवाराचा अधिक विचार केला जातो असे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक राजू नायक सांगतात. त्या दृष्टीने विचार करता ४० उमेदवारांपैकी भाजपने ३८ करोडपती उमेदवारांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसचे ३७ पैकी ३२ उमेदवार करोडपती आहेत. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या १३ उमेदवारांपैकी ९ उमेदवार कोट्याधीश आहेत. तृणमूल काँग्रेसने २६ उमेदवारांपैकी १७ करोडपती उमेदवारांना उमेदवारी दिली आहे. आम आदमी पार्टीने ३९ उमेदवारांपैकी २४ करोडपती उमेदवारांना तर राष्ट्रवादी काँग्रेसने १३ उमेदवारांपैकी करोडपती असलेल्या ८ उमेदवारांना उमेदवारी दिली आहे.
मायकल लोबो सर्वात श्रीमंत उमेदवार
कळंगुट मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर उभे राहिलेले मायकल लोबो हे सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. त्यांनी २८ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता तर ६४ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता दाखवली आहे. तर त्यांनी या पैकी २८ कोटी ८७ लाख रुपयांचं कर्ज असल्याचेही दाखवले आहे.