महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुख्य हंगाम गेल्याने गिलनेट मच्छिमारांवर उपासमारीची वेळ - sindhudurg latest news

परप्रांतीय मच्छिमारांची घुसखोरी व मासळी मिळण्याचे प्रमाण घटल्याने पारंपारिक मच्छिमारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

file photo
संग्रहित छायाचित्र

By

Published : Jun 17, 2020, 7:51 AM IST

सिंधुदुर्ग - जिल्ह्यात पारंपरिक रापण व्यावसायिकांबरोबरच पारंपरिक गिलनेट मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. हातावर पोट असलेल्या मच्छीमारांना गेल्या वर्षभरापासून मासळी मिळण्याचे प्रमाण फारच घटले आहे. परिणामी सध्या शेकडो गिलनेटधारकांच्या नौका बंदावस्थेत किनाऱ्यावर उभ्या आहेत. आता पावसाळा सुरू झाल्याने खाडीतली मासेमारी सुरू झाली आहे. मात्र, मुख्य हंगाम गेला व परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सधारकांकडून लाखो रुपयांची जाळी तोडून नुकसान केले जात आहे. यामुळे मच्छिमार अडचणीत आहेत.

संग्रहित दृश्य

गिलनेट म्हणजे छोट्या इंजिनच्या मदतीने किनाऱ्याच्या जवळपास होणारी पारंपरिक मासेमारी. यात आऊटबोट इंजिनधारक मांड व्यावसायिक, बुडाववाले, इनबोट इंजिनधारक बल्याववाले आणि वल्हवून मासेमारी करणारे तियानीवाले यांचा समावेश होतो. यातील मांड व्यावसायिक पारंपरिक मच्छीमारांचे बांगडा मासा हे प्रमुख मासेमारी. मात्र, यंदाच्या हंगामात जानेवारीपासून मे अखेरपर्यंत 'बांगडा मासा गेला कुठे'? असा प्रश्‍न जिल्ह्यातील गिलनेटधारकांना पडला आहे. बांगड्याच्या मासेमारीमध्ये यावर्षी 85 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त घट झाल्याचे मच्छीमारांनी सांगितले. बळा मासाही मिळणे दुर्मिळ झाले आहे. दुसरीकडे परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्स मात्र कोट्यवधी रुपयांचा बळा मासा पकडून आपल्या राज्याच्या मत्स्योत्पादनात भर घालत आहेत.

परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्स मत्स्य हंगामाच्या सुरुवातीलाच राज्याच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून स्थानिक मच्छीमारांच्या हक्काच्या बळा मासे लुटून नेतात. 15 ते 20 गावात मासेमारी करणाऱ्या छोट्या मच्छीमारांच्या जाळ्यात बळा मासा येण्यापूर्वीच हायस्पीड ट्रॉलर्सवाले तो लुटून नेत आहेत; मग स्थानिक मच्छीमारांना बळा मासा मिळणार कुठून? असा प्रश्न स्थानिक मच्छीमारांनी उपस्थित केला आहे. गिलनेटद्वारे पापलेट मासे पकडणाऱ्या पारंपरिक मच्छीमारांच्या पदरीही निराशाच आली आहे. बल्यावांद्वारे गिलनेट प्रकारातील न्हैय मासेमारी ही प्रामुख्याने सुरमईसाठी केली जाते. पण, बेकायदेशीर एलईडी पर्ससीन मासेमारीमुळे त्यांना सुरमई मिळणे कठीण बनले. परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सधारकांकडून लाखो रुपयांची जाळी तोडून नुकसान केले गेले आहे. दुसरीकडे काही मोजके एलईडी पर्ससीनधारक बांगडा, सुरमई, म्हाकूल, बळा, सौंदाळा वगैरे सर्वच माशांच्या साठ्यांवर डल्ला मारत असल्याने हजारो पारंपरिक मच्छीमारांवर आज बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

हेही वाचा -सिंधुदुर्गात 'चढणीचे मासे' पकडण्यासाठी लोकांची झुंबड

ABOUT THE AUTHOR

...view details