महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अडचणीत वाढ; गोवा बांबोळी रुग्णालयातील मोफत उपचार बंद

वर्षानुवर्षे सुरू असलेली मोफत आरोग्य सुविधा 1 जानेवारी 2018 पासून बंद करून गोवा सरकारने शुल्क आकारणी सुरू केली होती. दोडामार्ग तालुक्यात याबाबत जनआक्रोश आंदोलनही छेडण्यात आले होते. त्याचे फलित म्हणून महात्मा फुले जीवनदायी ही योजना लागू करण्यात आली होती. आता गोवा सरकारकडून प्रस्तावावर सही न केल्याने या योजनेत पुन्हा खंड पडला आहे.

Bamboli Hospital
बांबोळी रुग्णालय

By

Published : May 5, 2020, 11:50 AM IST

सिंधुदुर्ग - नेहमीच गोव्याच्या आरोग्य यंत्रणेवर अवलंबून असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अडचणीत आता नवीन भर पडली आहे. गोवा-बांबोळी रुग्णालयातील महात्मा फुले जीवनदायी योजना एप्रिलपासून बंद झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना उपचारासाठी आता पैसे मोजावे लागणार आहेत. गोवा सरकारने या योजनेबाबत योग्य कागदपत्रांची पूर्तता न केल्याने ही सेवा तात्पुरत्या स्वरुपात बंद झाली आहे.

वर्षानुवर्षे सुरू असलेली मोफत आरोग्य सुविधा 1 जानेवारी 2018 पासून बंद करून गोवा सरकारने शुल्क आकारणी सुरू केली होती. दोडामार्ग तालुक्यात याबाबत जनआक्रोश आंदोलनही छेडण्यात आले होते. त्याचे फलित म्हणून ही योजना लागू करण्यात आली होती. आता गोवा सरकारकडून प्रस्तावावर सही न केल्याने या योजनेत पुन्हा खंड पडला आहे. सिंधुदुर्गातील आरोग्य यंत्रणा नेहमीच व्हेंटिलेटरवर राहिली आहे. कधी यंत्रणा नाही, तर कधी डॉक्टर नाहीत, असे विदारक चित्र गेली कित्येक वर्षे आहे. त्यामुळे कोणत्याही छोटय़ा-मोठय़ा आजाराला येथील वैद्यकीय अधिकारी बांबोळीला जाण्याचा सल्ला देतात.

2017 च्या अखेरीस तेथील आरोग्य यंत्रणेवर येणारा आर्थिक ताण लक्षात घेऊन गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी गोव्याबाहेरील रुग्णांना सशुल्क सेवा देण्याचे जाहीर केले होते. गोवास्थित रुग्णांसाठी दीनदयाळ स्वास्थ्य योजना लागू करून त्यांना उपचार देण्याचा निर्णय घेण्यात आला. तर 1 जानेवारी 2018 पासून बिगर गोमंतकीय रुग्णांना सशुल्क सेवा देण्याचे ठरवण्यात आले. आता महात्मा फुले जीवनदायी योजनेची मुदत 31 मार्चला संपली असून त्या ठिकाणी कार्यरत इन्शुरन्स कंपनीचा करारही संपला आहे.

सद्यस्थितीत कंपनी बदलण्यात आली असून महाराष्ट्र शासनाकडून त्याबाबत कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली आहे. त्यातील नियमात काही प्रमाणात बदल झाल्याने गोवा शासनाच्यावतीने त्यावर स्वाक्षरी झालेली नाही. परिणामी तेथे उपचारासाठी पैसे मोजावे लागत आहेत. महात्मा फुले जीवनदायी योजना 13 फेब्रुवारी 2019 साली सुरू झाली होती. सद्यस्थितीत बांबोळी रुग्णालयात ठिकाणी प्रधानमंत्री जनआरोग्य योजना सुरू आहे. ही योजना 2019 पासुन सुरू झाली. मात्र, ठराविक रेशनकार्डधारकांनाच ती लागू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details