महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सिंधुदुर्गची आरोग्य यंत्रणा आधीच व्हेंटिलेटरवर त्यात चाकरमान्यांना आणण्याचा घाट कशासाठी - परशुराम उपरकर

चाकरमान्यांनी मुंबईतच थांबावे. कारण त्या ठिकाणी प्रशिक्षित डॉक्टर, चांगली आरोग्य सुविधा आहे. मुंबईत कोरोना संपेल तेव्हा गाववाले तुमचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करतील, असेही उपरकर यांनी सांगितले.

सिंधुदुर्गची आरोग्य यंत्रणा आधीच व्हेंटिलेटरवर त्यात चाकरमान्यांना आणण्याचा घाट कशासाठी - परशुराम उपरकर
सिंधुदुर्गची आरोग्य यंत्रणा आधीच व्हेंटिलेटरवर त्यात चाकरमान्यांना आणण्याचा घाट कशासाठी - परशुराम उपरकर

By

Published : May 9, 2020, 5:23 PM IST

सिंधुदुर्ग- जिल्ह्यात सरकारी 5 आणि खासगी 4 असे फक्त 9 व्हेंटिलेटर्स उपलब्ध आहेत. त्यात मुंबईतून चाकरमान्यांना गावी आणण्याचा घाट घातला जात आहे. यातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढून जिल्हा रेड झोनमध्ये जाण्याची दाट शक्यता आहे, असे मनसेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर म्हणाले आहेत. संस्थात्मक क्वारंटाईनसाठी शाळा मंदिरे घेतली जात आहेत. परंतु येथे लाईट, शौचालय, बाथरूम आदी सुविधा नाहीत. त्यामुळे चाकरमानी अशा ठिकाणी राहणार नाहीत. ते आपल्या घरी जातील आणि या रोगाचा प्रादुर्भाव वाढेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

शिवसेना-भाजप नेत्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी मुंबईच्या चाकरमान्यांना भडकविण्याचे काम केले. त्यांना गावी आणण्याची भाषा केली. यामुळे जे मुंबईत राहायला इच्छुक होते त्यांना गावी जाण्याचा मोह तयार झाला. याचा परिणाम येथील आरोग्य यंत्रणेवर होणार आहे आणि हे चाकरमाने मोठ्या प्रमाणात आल्यास आरोग्य यंत्रणेवर त्याचा ताण येणार आहे, असेही उपरकर म्हणाले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अद्ययावत सुविधा नाहीत. शाळा, मंदिरे साफ केली तरी त्या ठिकाणी बाथरूम किंवा पाण्याची सोय नाही. येथे संस्थामक क्वारंटाईन केल्यास हे लोक घरी जाऊ शकतात. घरातील सामान नेता आणताना कोरोनाचा प्रसार होऊ शकतो असेही ते म्हणाले. सत्तेतील लोकप्रतिनिधींनी याचा आधी विचार करायला हवा होता की आपण सत्तेत असताना या जिल्ह्यात आरोग्याच्या किती सेवा निर्माण केल्या. आपल्या जिल्ह्यात कोरोना नव्हता जे 5 रुग्ण मिळालेत ते मुंबईचे होते. चाकरमान्यांची व्यवस्था करायला आम्ही सक्षम नाहीत असे सरपंचांचे मत आहे. जिल्ह्यात शासकीय 5 व खासगी 4 व्हेंटिलेटर्स आहेत. रुग्ण दगावल्यास चाकरमान्यांना आणायचे वक्तव्य करणारेच जबाबदार असतील असेही उपरकर म्हणाले.

मुंबईत बसून बोलणे सोपे मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे चाकरमान्यांनी मुंबईतच थांबावे. कारण त्या ठिकाणी प्रशिक्षित डॉक्टर, चांगली आरोग्य सुविधा आहे. मुंबईत कोरोना संपेल तेव्हा गाववाले तुमचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करतील, असेही उपरकर यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details