सिंधुदुर्ग -कुत्र्यावर हल्ला करण्याच्या प्रयत्न करणारा बिबट्या विहिरीत पडण्याची घटना घडली होती. अखेर वनविभागाच्या अथक प्रयत्नांनी त्या बिबट्याला बाहेर काढण्यात यश आले आहे. ही घटना सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड कुंभारवाडी येथील शेतकरी अनिल नामदेव मुळीक यांच्या घराशेजारी घडली.
शेतकरी अनिल नामदेव मुळीक यांच्या घराशेजारी त्यांच्या स्वमालकीची विहीर आहे. भक्ष्याच्या शोधात आलेल्या बिबट्याने मुळीक यांच्या पाळीव कुत्र्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी तो बिबट्या विहिरीत कोसळला. कुत्रे जोरात भुंकू लागल्याने व रात्रीच्या वेळी विहिरीच्या पाण्यात काहीतरी पडल्याने मोठा आवाज आल्याने मुळीक यांनी बाहेर येऊन विहिरीत पाहिले असता विहिरीत बिबट्या पडल्याचे त्यांना दिसून आले.
पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आलेला बिबट्या हेही वाचा -दहिसरमध्ये गोळी झाडून ज्वेलर्स मालकाची हत्या
वनविभागाचे अधिकारी तत्काळ दाखल -
यानंतर अनिल मुळीक यांनी मळेवाड कोंडूरे सरपंच हेमंत मराठेंना याबाबत माहिती दिली. यानंतर मराठे यांनी तत्काळ वनपाल धुरी यांना संपर्क करत बिबट्या विहिरीत पडला असल्याची माहिती दिली. यानंतर वन कर्मचारी व अधिकारी घटनास्थळी पिंजरा घेऊन उपस्थित झाले. बिबट्याला पिंजऱ्यात पकडण्यासाठी विहिरीत पिंजरा सोडण्यात आला. घाबरलेल्या अवस्थेत असलेला बिबट्या पिंजऱ्यात जात नव्हता. मात्र, अखेर अथक परिश्रम केल्यानंतर वन विभाग कर्मचारी व ग्रामस्थांनी विहिरीत पडलेल्या बिबट्याला पिंजऱ्यामध्ये जेरबंद केले आणि सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला.
परिसरात बिबट्याचा होता वावर -
गेले कित्येक दिवस या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने भीतीचे वातावरण होते. मात्र, आता बिबट्याला जेरबंद केल्याने ग्रामस्थ व शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले आहे. यावेळी वन अधिकारी गजानन पानपट्टे, वनपाल सी. व्ही. धुरी, वरक्षक गेजगेंनी स्थानिकांच्या मदतीने बिबट्याला बाहेर काढण्यात आले. विहिरीत पडलेल्या बिबट्याला पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.
हेही वाचा -लॉकडाऊनमुळे व्यवसाय बदलून सुरू केले शेळीपालन; बिबट्याच्या हल्ल्यात टेलरचा मृत्यू