महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सिंधुदुर्गात संततधार; जिल्ह्यात काही ठिकाणी पूरस्थिती कायम

जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे. सध्या पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी काही ठिकाणी पूर परिस्थिती कायम आहे

निर्माण झालेली पूरस्थिती

By

Published : Aug 8, 2019, 4:11 PM IST

Updated : Aug 8, 2019, 5:48 PM IST

सिंधुदुर्ग- जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे. सध्या पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी काही ठिकाणी पूर परिस्थिती कायम आहे. कुडाळ व वेताळबांबर्डे येथे महामार्गावर पाणी आल्याने महामार्गावरील वाहतूक बंद होती. सध्या ही वाहतूक सुरळीत झाली आहे. तसेच आंबेरी पुलावरील पाणी ओसरल्याने या पुलावरील वाहतूक देखील सुरू झाली आहे.

सिंधुदुर्गात संततधार

मालवण तालुक्यातील काळसे येथे प्रताप परब, गुरुनाथ पवार यांच्या घरावर झाड पडल्याने एकूण १८ हजारांचे नुकसान झाले आहे. पांडुरंग कोरगावकर यांच्या घराचे छप्पर कोसळले आहे. तसेच दोन घरांच्या भिंती कोसळल्या आहेत. खारेपाटण बाजारपेठेत पाणी आल्याने ५ जणांना सुरक्षीत स्थळी हलविण्यात आले आहे. तर दोडामर्ग तालुक्यात दावतेवाडी येथे डोंगर खचला आहे. दोडामार्ग तालुक्यातील आवाडे वालपोई येथील ५ नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले असून कुडासे वानुशिवाडी येथील ५ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. आंबोली घाटात कोसळलेली दरड बाजुला करुन वाहतूक सुरू करण्यात आली होती. मात्र, पुन्हा रस्त्यावर माती आल्याने हा घाट मार्ग बंद करावा लागला. तर कोल्हापूर येथे असलेल्या पूर परिस्थितीमुळे सिंधुदुर्गातून कोल्हापूरकडे जाणारे करुळ, फोंडा घाटमार्गही बंद आहेत.

सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतीचे नुसकान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या जिल्ह्यातील ७ हजार ६७६ हेक्टर शेती क्षेत्र पूर बाधीत झाली आहे. आणखी २ दिवस पावसाचा जोर कायम राहिल्यास भात पिक कुजण्याची प्रक्रिया सुरू होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. तिलारी धरणातून २७ हजार क्युसेक्सचा विसर्ग सुरु आहे.

तिलारी आंतरराज्य प्रकल्प ९३.०७ टक्के भरला असून सध्या या धरणातून २७ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील २४ तासांत ३२७.६० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तिलारी धरणातील विसर्गामुळे दोडामार्ग तालुक्यातील ७ गावांना पुराचा वेढा पडला आहे. हवामान विभागाने देखील दोडामार्ग परिसरातील लोकांना लाल इशारा (रेड अलर्ट) दिला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. तर देवघर मध्यम प्रकल्प ८६.४२ टक्के भरला असून सध्या या धरणातून १३०.८८ घ.मी. प्रतिसेकंद इतका विसर्ग सुरू आहे. तर अरुणा प्रकल्प १०७ टक्के भरला आहे. जिल्ह्यातील २१ लघु पाटबंधारे प्रकल्प १०० टक्के भरले आहेत.

Last Updated : Aug 8, 2019, 5:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details