सिंधुदुर्ग -वेंगुर्ले शहरात येणाऱ्या नागरिकांना पिण्याचे पाणी विनासायास उपलब्ध व्हावे, यासाठी वेंगुर्ले नगरपरिषदेने नाविण्यपुर्ण योजनेतून शहरात पाच ठिकाणी वॉटर एटीएम मशिन बसविली आहेत. वॉटर एटीएम सुविधा उपलब्ध करुन देणारी वेंगुर्ले नगरपरिषद ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच नगरपरिषद आहे. या वॉटर एटीएम सुविधेचा शुभारंभ मंगळवारी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते करण्यात आला.
वेंगुर्ले शहरात ग्रामिण भागातून येणाऱ्या लोकांना, शहरातील नागरिकांना तसेच विशेषत: पर्यटकांना स्वच्छ पिण्याचे पाणी विनासायास व अल्प किंमतीत उपलब्ध व्हावे, यासाठी नगरपरिषदेने कौन्सिल सभेत वेंगुर्ले बंदर, दाभोली नाका, रामेश्वर मंदिर, हॉस्पिटल नाका व नगर परिषद इमारत अशा पाच ठिकाणी वॉटर एटीएम मशिन सुविधा उभारण्यासंदर्भात ठराव करुन हा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविला होता. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तत्कालीन पालकमंत्री दिपक केसरकर यांनी त्यासाठी नाविण्यपुर्ण योजनेतून ३० लाख रुपये निधी मंजूर केला होता.