सिंधुदुर्ग-रोजीरोटीसाठी घरापासून शेकडो मैल दूर त्यात कोरोनाची संसर्गाची होण्याची भीती लॉकडाऊन मुळे रोजगार नाही. रोजगार नसल्याने चूल पेटत नाही, गांवाकडे संचारबंदीमुळे जाता येत नाही, अशी अवस्था सिंधुदुर्गमध्ये अडकलेल्या मजुरांची झाली होती. मात्र, गावाकडे जाता येणार असल्याने दीड -दोन महीने अडकलेल्या मजूरांच्या चेहऱ्यावर आनंद होता. गावाकडे जाण्याची लगबग, आप्तेष्टांना भेटण्याची ओढ, प्रवासाचा उत्साह, डोक्यावर संसाराचे ओझे घेऊन घरच्या ओढीने सुरु असलेली मजुरांची धावपळ, असे चित्र सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्थानकात होते. लॉकाडाऊनमुळे गेले दोन महिले शांत असलेल्या सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्थानकात जिल्ह्यातून सुटणाऱ्या पहिल्या विशेष श्रमिक रेल्वे मुळे गर्दीचे चित्र होते.
सिंधुदुर्गनगरी येथून धावली पहिली विशेष श्रमिक रेल्वे जिल्ह्यात अडकलेल्या मजूर, कामगार यांना त्यांच्या गावी जाता यावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांमुळे गुरुवारी विशेष श्रमिक रेल्वे कर्नाटकातील विजापूरकडे रवाना झाली. जिल्ह्यातून एकूण 1 हजार 440 मजूर व कामगार या रेल्वेने त्यांच्या गावी रवाना झाले. यावेळी मजुरांच्या चेहऱ्यावर समाधान व गावी जाण्याचा आनंद दिसून येत होता. सिंधुदुर्गनगरी येथून सुटलेली ही रेल्वे मडगाव व हुबळी स्थानकात थांबा घेऊन विजापूर येथे पोहचणार आहे. यावेळी प्रवाशांना ल्यूपीन फाऊंडेशनच्या माध्यमातून पाण्याची बाटली,मास्क,साबन व फूड पॅकेट्सचे वाटप करण्यात आले.
जिल्ह्यातील सहा तालुक्यातील 1 हजार 440 कामगार व मजुरांना दुपारपर्यंत एस. टी. बसमधून सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्थानकामध्ये आणण्यात आले. कुडाळ तालुक्यातील 359 व्यक्ती 18 बसगाड्यांमधून, देवगड तालुक्यातील 371 व्यक्ती 18 गाड्यांमधून, मालवण तालुक्यातील 307 व्यक्ती 15 गाड्यांमधून, कणकवली तालुक्यातील 235 व्यक्ती 13 गाड्यामंधून, सावंतवाडी तालुक्यातील 25 व्यक्ती 1 गाडीमधून तर वेंगुर्ला तालुक्यातील 71 व्यक्ती 4 गाड्या अशा एकूण 69 एस.टी बस मधून सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्थानकात आणण्यात आले. या वाहतूकीवेळी सामाजिक अंतराचे योग्य ते पालन करण्यात आले. तसेच सामाजिक अंतराचे पालन करत या सर्वांना त्यांची तिकीटे देत रेल्वेमध्ये आसनस्थ करण्यात आले.
सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्थानकात आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, कुडाळच्या प्रांताधिकारी वंदना खरमाळे, कणकवलीच्या प्रांताधिकारी वैशाली राजमाने, सावंतवाडीचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, भूसंपादनचे उपजिल्हाधिकारी प्रशांत ढगे, जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलिपे, तर कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक टी. मंजुनाथ, रेल्वे पोलीस दलाचे सहाय्यक सुरक्षा आयुक्त सतीशन व्ही.व्ही., स्टेशन मास्तर वैभव दामले यांच्यासह सर्व तालुक्यांचे तहसीलदार उपस्थित होते.