सिंधुदुर्ग -उन्हाळी सुट्टीसाठी गावी आलेल्या बाप लेकाचा पाण्यात बुडून अंत झाल्याची दुर्दैवी घटना मालवण तालुक्यातील श्रावण गावात घडली आहे. महेश वेदरे आणि मयूर वेदरे (मुलगा) अशी मृतांची नावे आहेत. दोघेही घरानजीक असलेल्या नदीत शुक्रवारी (१७ मे) अंघोळीसाठी गेले होते.
पती आणि मुलाच्या अचानक जाण्याने धक्का बसलेल्या मयुरच्या आईचा आक्रोश हृदय हेलावून टाकणारा होता. महेश हे मूळ श्रावणचे असून सध्या नोकरीनिमित्त ते मुंबईत वास्तव्यास होते. त्यांनी १० वर्षांपूर्वी नोकरीसाठी मुंबई गाठली होती. तिथे आपला संसार थाटला. मात्र, गावाची ओढ असल्याने जशी सुट्टी मिळेल तसे ते गावी येत असत. महेश या मे महिन्यात आठ दिवसांपूर्वी पत्नी आणि मुलासमवेत गावी आले होते. ८ दिवस गावात राहून जुन्या आठवणीत रंगून गेलेले महेश लवकरच पुन्हा मुंबईला परतणार होते. मात्र, नियतीने एक दिवस अगोदरच त्यांच्या मुलासह त्यांच्यावर घाला घातला.