पणजी -गोवा राज्यात सध्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. तसे अनेक राजकीय पुढाऱ्यांना आतापासून आमदार व्हायची स्वप्नेही पडू लागली आहेत. काही राजकीय पक्ष तर येणाऱ्या विधानसभेत आपलीच सत्ता असल्याच्या आविर्भावात आहेत. सध्या राज्यात हिंदू आणि ख्रिश्चन समुदायावर भावी विधानसभेचे चित्र स्पष्ट होणार आहे. राज्यात नेहमीच हिंदू-ख्रिश्चन मतांचे राजकारण सुरू आहे. वर्षानुवर्षे अनेक ख्रिस्ती आमदार असलेल्या काँग्रेसच्या आमदारांना भाजपने आपल्या पक्षात घेऊन सत्तेची घडी व्यवस्थित बसवली आहे. तेव्हापासून अनेक काँग्रेसमधून निवडून आलेले ख्रिस्ती आमदार जनता व ख्रिस्ती धर्मगुरूंच्या टीकेचे धनी झाले आहेत.
राजकारणात केलेल्या कर्माचा हिशोब द्यावा लागेल - फादर गुदीन्हो
'राजकारणात येऊन तुम्ही जनतेची सेवा करण्याऐवजी गोव्याची माती केली आहे. स्वतःच्या फायद्यासाठी इकडून तिकडे माकडउड्या मारत आहात. तुम्ही केलेल्या कर्माचा तुम्हाला हिशोब द्यावा लागेल', असे विधान शिवोली चर्चचे फादर रॉजर गुदीन्हो यांनी केले आहे. यातून त्यांनी ख्रिस्ती पुढाऱ्यांचे सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून चांगलेच कान टोचले आहेत.
असे का म्हणाले धर्मगुरू?
राज्यातील अनेक बडे नेते काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले आहेत. मात्र, भाजपने सत्ता स्थिर करण्यासाठी या बड्या नेत्यांना आपल्या पक्षात घेऊन सत्तेची घडी बसवली. पण 2022 ची विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना भविष्यात आमदार होण्यासाठी अनेक नेत्यांनी पक्षांतर करण्यास सुरुवात केली आहे. त्यात सगळ्या जास्त ख्रिस्ती नेत्यांचा समावेश आहे. त्यामुळे यावर आपली नाराजी व्यक्त करताना सिकेरी येथील सेंट लॉरेन्स चर्च चे फादर रॉजर गुदीन्हो म्हणाले, की 'तुम्ही केलेल्या कर्माचा हिशोब एक दिवस देवाला द्यायचा आहे. त्याची सुरुवात आतापासूनच झाली आहे'.
राजकारण्यांनी स्वार्थापायी गोव्याची माती केली - फादर गुदीन्हो
'राज्यातील जनतेने तुम्हाला त्यांची सेवा करण्यासाठी निवडून दिले होते. मात्र तुम्ही स्वतः चाच फायदा करून घेण्यासाठी इकडून तिकडे माकडउड्या मारत आहात. त्यामुळे तुम्ही जनतेचा विश्वासघात केला असून यात पूर्णतः तुमच्या स्वार्थापायी सुंदर गोव्याची माती झाली आहे', असे फादर गुदीन्हो म्हणाले.