सिंधुदुर्ग -आमदार नितेश राणे यांचे खासगी सचिव राकेश परब हे देखील कणकवली पोलिसांच्या ताब्यात आहेत. यावेळी नितेश राणे आणि राकेश परब यांची कणकवली पोलीस समोरासमोर चौकशी ( Interrogation of MLA Nitesh Rane and Rakesh Parab ) करत आहेत.
हेही वाचा -पुण्याहून गोव्याला निघालेल्या लक्झरी बसला वैभववाडी करूळ घाटात लागली आग
नितेश राणे यांचे शिवसैनिक संतोष परब खुणी हल्ल्यातील मुख्य आरोपी पुणे येथील सचिन सातपुते याच्यासोबत राकेश परबच्या मोबाईलवरून संभाषण झाले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. राकेश परब यांच्या मोबाईलवर सचिन सातपुते यांचे एकूण 38 कॉल आढळून आले आहेत. पोलीस तपासात ही बाब निष्पन्न झाल्यानंतर राकेश परब यांच्या मोबाईलवरून नितेश राणे यांचे सातपुते याच्यासोबत संभाषण झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याबाबतचा तपास कणकवली पोलीस या दोघांनाही समोरासमोर बसवून करत आहेत. यावेळी जे बोलणे झाले ते नेमके कोणत्या मोबाईलवरून झाले याची चौकशी देखील यावेळी करण्यात येत आहे.
नितेश राणेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी
शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात भाजपा आमदार नितेश राणे यांना कणकवली न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नितेश राणे हे कणकवली न्यायालयात काल शरण आले होते. नितेश राणे यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेला जामीन अर्ज काल मागे घेण्यात आला. त्यानंतर ते कणकवली न्यायालयात शरण आले होते. न्यायालयासमोर शरण आल्याने न्यायालयाने तपास अधिकाऱ्यांना नोटीस पाठवून म्हणणे मागवले. त्यानंतर राणेंचे वकील व सरकारी वकिलांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला. सरकारी वकिलांनी राणेंना दहा दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती. त्यावर न्यायालयाने ४ फेब्रुवारीपर्यंत म्हणजे दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आमदार नितेश राणे यांचा राज्य सरकारवर आरोप
दरम्यान कणकवली न्यायालयात हजर होण्यापूर्वी आमदार नितेश राणे यांनी राज्य सरकारवर आरोप केला. सरकार मला बेकायदेशीरपणे अटक करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करत मी कणकवली न्यायालयात हजर होत आहे, असे ते यावेळी म्हणाले.