सिंधुदुर्ग - महाराष्ट्रात जर काँग्रेसचा मुख्यमंत्री असता आणि शिवसेना विरोधी पक्षात असती तर मंदिरांबाबत त्यांची हीच भूमिका असली असती का, हा खरा कळीचा मुद्दा आहे. आघाडीतल्या काॅंग्रेस पक्षांच्या इच्छेनुसार इथे महाराष्ट्रात दारूचे बार सुरू होतात. चित्रपटगृहे सुरू होतात, रेस्टॉरंटस आणि लॉजेस सुरू होतात. पर्यटन स्थळे, मस्तीचे धंदे जोरात सुरू होतात पण भाविकांच्या श्रद्धेची आणि भक्तीची स्थाने असलेली मंदिरे महाराष्ट्रात सुरू होऊ शकत नाहीत, हे लाजिरवाणे दुर्दैव असल्याची टीका माजी आमदार प्रमोद जठार यांनी केली आहे.
ज्या जगदंबेचे नाव घेत छत्रपती शिवरायांनी मंदिरांना सन्मान देणारे स्वराज्य महाराष्ट्रात निर्माण केले. त्याच महाराष्ट्रात नवरात्राच्या पवित्र वातावरणातही आज मंदिरे बंद आहेत. त्याच आई जगदंबेच्या दर्शनासाठी पुन्हा एकदा 'दार उघड बये दार उघड' म्हणत टाहो फोडायची वेळ या ठाकरे सरकारने आणली आहे. केवळ स्वतःच्या सत्तेसाठी पांघरलेला हा शिवसेनेचा स्वार्थी दुटप्पीपणा उघड करण्यासाठी भाजपाने आता एल्गार पुकारला पाहिजे. दारूचे बार उघडे पण मंदिरांचे दरवाजे बंद ही स्थिती शिवरायांच्या महाराष्ट्रासाठी लज्जास्पद आहे. आता ह्याला एकच पर्याय, जोपर्यंत भाविकांची श्रद्धास्थाने असलेली ही मंदिरे उघडली जात नाहीत तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रभर सगळ्या जिल्ह्यात, तालुक्यात आणि गावागावात, शहरा शहरात मंदिरांच्या बाहेर रस्त्यावर महाआरतीची आता सुरुवात करावी लागेल, असा इशारा प्रमोद जठार यांनी दिला.