महाराष्ट्र

maharashtra

कोरोनातही सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोषण आहाराचे वितरण

By

Published : Jun 16, 2021, 5:06 PM IST

कोरोणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये अंगणवाडी बंद आहेत. तरीही अंगणवाडीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसह एकूण 40 हजार 328 लाभार्थ्यांना अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून घरपोच पोषण आहार पोहचविला जात आहे.

Nutrition Food Distribution Sindhudurg
पोषण आहार वितरण लाभार्थी सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग - कोरोणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये अंगणवाडी बंद आहेत. तरीही अंगणवाडीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसह एकूण 40 हजार 328 लाभार्थ्यांना अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून घरपोच पोषण आहार पोहचविला जात आहे. यामध्ये कडधान्य, धान्य, तेल आणि मसाल्यांचे पदार्थ यांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेने हा आहार आमच्यापर्यंत पोहचविण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला असल्याचे लाभार्थ्यांनी सांगितले.

माहिती देताना लाभार्थी

हेही वाचा -सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन नद्यांना पूर, गड नदीने ओलांडली धोक्याची पाणीपातळी

अंगणवाडी विद्यार्थ्यांसह स्तनदा माता, गरोदर स्त्रियाही आहेत लाभार्थी

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाच्या माध्यमातून 1 हजार 587 अंगणवाड्या चालविल्या जातात. या अंगणवाड्यांच्या माध्यमातून 40 हजार 328 लाभार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ दिला जातो. या लाभार्थ्यांमध्ये 6 महिने ते 6 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांबरोबरच, स्तनदा माता, गरोदर स्त्रिया या लाभार्थ्यांचा देखील सहभाग आहे. या लाभार्थ्यांमध्ये 6 महिने ते 3 वर्षे वयोगटातील 16 हजार 456 मुले आहेत. 3 ते 6 वर्षे वयोगटातील 18 हजार 466 मुले आहेत. शाळाबाह्य एक विद्यार्थी आहे, तर 2 हजार 98 गरोदर स्त्रिया, 3 हजार 307 स्तनदा माता असे लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना गहू, मसूर, डाळ, सोयाबीन तेल, चणाडाळ, हळद, मिरची पावडर, तांदूळ, मीठ अशा गोष्टींचा पोषण आहार दिला जातो.

2098 गरोदर स्त्रिया आणि 3307 स्तनदा मातांना वितरित केला जातो आहार

या लाभार्थ्यांमधील 2098 गरोदर स्त्रिया आणि 3307 स्तनदा माता या लाभार्थ्यांना एकूण गहू 18 हजार 199.50 किलो, मसूर डाळ 10 हजार 478.50 किलो, मिरची पावडर 1103 किलो, हळद पावडर 1103 किलो, मीठ 2206 किलो, सोयाबीन तेल 2 हजार 757.50 लिटर, चणाडाळ 1103 किलो दिली जाते. तर, तीन वर्ष ते सहा वर्ष वयोगटातील 18 हजार 466 मुलांना चणाडाळ 27 हजार 13. 50 किलो, मसूर डाळ 25 हजार 212.69 किलो, मिरची पावडर 3 हजार 601.80 किलो, हळद पावडर 3 हजार 601.80 किलो, मीठ 7 हजार 203.60 किलो, सोयाबीन तेल 9 हजार 4 लिटर, तांदूळ 55 हजार 828 किलो दिला जातो. 6 महिने ते 3 वर्षे वयोगटातील 16 हजार 456 मुलांना 45 हजार 740.80 किलो गहू, 24 हजार 504 किलो मसूर डाळ, 3 हजार 267.20 किलो मिरची पावडर, 3हजार 267.20 किलो हळद पावडर, 6 हजार 534.49 किलो मीठ, 8 हजार 168 लिटर सोयाबीन तेल, 24 हजार 504 किलो चणाडाळ दिली जाते.

आम्हाला घरपोच किंवा अंगणवाडीत मिळतो आहार

कुडाळ तालुक्यातील डिगस गावचे रहिवाशी असलेले प्रसाद बळीराम पाताडे हे सांगतात, माझी मुलगी दोन वर्षांची आहे. ती अंगणवाडीमध्ये शिकते. अंगणवाडीच्या माध्यमातून मिळणारा पोषण आहार हा सध्या अंगणवाडी बंद असलीतरी काही वेळा आम्हाला घरपोच मिळतो. किंवा काही वेळा आम्ही तो अंगणवाडीत जाऊन घेवून येतो. सध्या दोन महिन्यांचा पोषण आहार एकावेळी अंगणवाडीमध्ये मिळतो. यामध्ये कडधान्य, धान्य अशा विविध वस्तूंचा समावेश आहे. न चुकता हा पोषण आहार आम्हाला आजही मिळत आला आहे. तसेच, एखाद्या महिन्यात आहार आला नाही तर आम्हाला तो पुढच्या महिन्यात एकत्रित दिला जातो, असेही पाताडे यांनी सांगितले.

अंडी, दुध नाही तर पौष्टिक कडधान्य मिळते

तर कणकवलीतील रहिवाशी उमेश बुचडे यांची दोन मुले येथील अंगणवाडीत शिकतात, ते सांगतात इतर ठिकाणी मिळतात तशी अंडी आणि दूध आम्हाला या ठिकाणी मिळणाऱ्या आहारात मिळत नाही. मात्र, आम्हाला आहार अंगणवाडीत आला की अंगणवाडी सेविका कळवतात, नंतर अंगणवाडीत जाऊन आम्ही हा आहार घरी घेऊन येतो, असे ते म्हणाले. पहिले हा आहार अंगणवाडीत शिजवून दिला जात होता, मात्र आता कोरोनामुळे शाळा बंद आहेत. आम्हीही मुलांना शाळेत पाठवत नाही. मात्र, पोषण आहार न चुकता आम्हाला मिळत असल्याचे ते म्हणाले.

जिल्हा परिषदेने केली आहार पोहचवायची व्यवस्था

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, त्यामुळे आजही अंगणवाड्या सुरू होऊ शकलेल्या नाहीत. किंबहुना पालक देखील आपल्या मुलांना शाळेत पाठवायला तयार नाहीत. मात्र, जिल्हा परिषदेने विशेष व्यवस्था करत विद्यार्थ्यांचा, गरोदर मातांचा, स्तनदा मातांचा पोषण आहार त्यांच्यापर्यंत पोहचवण्याची व्यवस्था केली आहे. जिल्ह्यात आजही व्यवस्थितपणे पोषण आहार पोहचत आहे, हेच विशेष आहे.

हेही वाचा -सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ मुहूर्ताच्या प्रतीक्षेत; सत्ताधारी, विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप

ABOUT THE AUTHOR

...view details