मुंबई- सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे उद्घाटन 9 ऑक्टोबरला दुपारी 12.30 ला सिंधुदुर्गात होणार आहे. या विमानतळाच्या उद्घाटनावरून महाविकास आघाडी सरकार आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. कोकणात जाणाऱ्यांसाठी विमान प्रवास सुरू करण्यात यावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून कोकणवासियांकडून करण्यात येत होती. अखेर 12 सप्टेंबर, 2018 या दिवशी या विमानतळावर हवाई चाचणीही यशस्वीपणे पार पाडली. तरीही चिपी विमानतळ सुरू होण्यासाठी 2021 पर्यंत वाट पाहावी लागली. तसेच हे 'विमानतळ सुरू करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शेवटी मुख्यमंत्री व्हावे लागले", असे म्हणत सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी भारतीय जनता पक्ष आणि नारायण राणे यांना चिमटा काढला आहे. तसेच चिपी विमानतळाच्या उद्घाटनाची कार्यक्रम पत्रिका तयार झाली असून, त्यावर सर्वात आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव असून, दुसरे नाव हवाई उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे आहे. तर तिसरे नाव केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली. या महत्त्वाच्या नावानंतर राजकीय शिष्टाचारानुसार इतर सर्व नेते आणि मंत्र्यांची नावे असल्याचेही यावेळी उदय सामंत यांनी सांगितले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांशिवाय चिपी विमानतळाचे उद्घाटन होऊ शकते, असे म्हणणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आघाडी सरकारमधील मंत्री उदय सामंत यांनी चिमटा काढलेल्याचे दिसत आहे.
राजशिष्टाचाराप्रमाणे मुख्यमंत्र्यांना आमंत्रण
विमानतळाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम हा केंद्रीय मंत्र्यांच्या अखत्यारीतील आहे. त्यामुळे केंद्रीय हवाई उड्डयन विभागाकडून राज शिष्टाचारानुसार मुख्यमंत्र्यांना आमंत्रण देण्यात येईल, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे काही दिवसांपूर्वी मुंबईत म्हणाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमास उपस्थित राहिल्यास काही गैर नाही, असे म्हणत राणेंनी महा विकास आघाडीला कोपरखळी मारली होती. अजूनही चिपी विमानतळाच्या उद्घाटनासाठी आठ दिवसांचा वेळ शिल्लक आहे. त्यामुळे चिपी विमानतळाच्या श्रेयवादावरून पुढील आठ दिवसात ही श्रेय वादाची लढाई अजून तीव्र होण्याची चिन्ह नाकारता येत नाही.
मुंबई-सिंधुदुर्ग हवाई प्रवासाला मोठा प्रतिसाद
मुंबई-सिंधुदुर्ग हवाई मार्ग सुरू व्हावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून कोकणवासियांकडून केली जात होती. ही मागणी आता सत्यात उतरत असताना 20 ऑक्टोबर रोजी मुंबई-सिंधुदुर्ग हवाई मार्गाच्या तिकिटांची बुकिंग ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. या बुकिंगला प्रवाशांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला असून केवळ एका तासात सर्व बुकिंग फुल झाली आहे. मुंबई-सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग-मुंबई, अशी हवाई सेवा असून 'एअर अलायन्स' या हवाई सेवा देणाऱ्या कंपनीकडून ही सेवा सध्या उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद पाहता इतरही हवाई सेवा देणाऱ्या विमान कंपन्या यात सामील होतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.