सिंधुदुर्ग -आंबोलीच्या हिरण्यकेशी नदीपात्रातून गोड्या पाण्यातील माशाच्या नवीन प्रजातीचा शोध लावण्यात यश आले आहे. 'स्चीस्टुरा हिरण्यकेशी' असं या माशाच्या प्रजातीला नाव देण्यात आले आहे. या माशाची प्रजात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे, शंकर बालसुब्रमण्यम आणि डॉ. प्रवीणराज जयसिन्हा या संशोधकांनी जगासमोर आणली आहे.
पश्चिम घाटातील आंबोली हे गाव जैवविविधतादृष्ट्या अतिशय संपन्न व संवेदनशील समजले जाते. या ठिकाणी नेहमीच विविध क्षेत्रांतील संशोधकांकडून संशोधन करण्यात आली आहेत. यामध्ये विविध प्रकारचे बेडूक, साप, पक्षी, फुलपाखरे, वनस्पती यांच्या नवनवीन प्रजाती संशोधनाअंती जगाच्या समोर आल्या आहेत. यातल्या काही प्रजाती तर, जगाच्या पाठीवर केवळ आंबोलीमध्येच सापडतात, त्यामध्येच आता आणखी एक या गोड्या पाण्यातील माशाची भर पडली आहे. हिरण्यकेशी अर्थात सोनेरी केस असलेला हा मासा सध्यातरी हिरण्यकेशी येथील उगमापाशी असलेल्या कुंडामध्ये आढळून आलेला आहे. अद्याप या माशाची नोंद इतरत्र कुठेही आढळलेली नाही. हा मासा हिरण्यकेशी नदी पात्रात सापडल्याने या माशाला या नदीच्याच नावावरून हे स्चीस्टुरा हिरण्यकेशी असे नाव देण्यात आले आहे.