महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'नारायण राणे केंद्रात मंत्री झाल्याने सिंधुदुर्गाचा होणार विकास; नाणार प्रकल्पाची चळवळ धरेल जोर'

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणे यांचा लघु-मध्यम उद्योग मंत्री म्हणून समावेश करण्यात आला आहे. त्यांना मिळालेल्या या मंत्रालयाचा फायदा कोकणाला होऊ शकतो, किंबहुना कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्पाची चळवळ जोर धरेल, असे मत जेष्ठ पत्रकार विजय गावकर यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, नाणार हा मोठा प्रकल्प आहे. त्याच्यासोबत राणेंच्या या मंत्री पदामुळे कोकणात लघु उद्योग उभे राहतील. पर्यावरण पूरक उद्योग इथे उभे राहिले तर इथला बेरोजगारीचा प्रश्नही सुटेल.

By

Published : Jul 8, 2021, 12:37 PM IST

Updated : Jul 8, 2021, 12:51 PM IST

नारायण राणे केंद्रात मंत्री
नारायण राणे केंद्रात मंत्री

सिंधुदुर्ग - माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी बुधवारी मोदीच्या मंत्रिमंडळ विस्तारात केंद्रीय मंत्री पदाची शपथ घेतली. राणेंचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्याने आता कोकणला फायदा तर होणारच आहे, शिवाय येथील सी वर्ल्ड सारखे रखडलेले प्रकल्प मार्गी लागू शकतात. विशेष म्हणजे नाणार रिफायनरी प्रकल्पाची चळवळ जोर घेईल, असे जिल्ह्यातील अभ्यासकांना वाटत आहे. तर राणेंची मंत्रिमंडळात वर्णी लागल्याने जिल्ह्याच्या विकासाला नवी गती मिळेल, असे त्यांच्या निकटवर्तीयांना वाटत आहे. नारायण राणे यांच्याकडे मध्यम व लघू उद्योग मंत्रालयाचा पदभार सोपवण्यात आला आहे.

राणे केंद्रात मंत्री झाल्याने सिंधुदुर्गाचा होणार विकास

नाणार रिफायनरी प्रकल्पाची चळवळ जोर धरेल-

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणे यांचा लघु-मध्यम उद्योग मंत्री म्हणून समावेश करण्यात आला आहे. त्यांना मिळालेल्या या मंत्रालयाचा फायदा कोकणाला होऊ शकतो, किंबहुना कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्पाची चळवळ जोर धरेल, असे मत जेष्ठ पत्रकार विजय गावकर यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, नाणार हा मोठा प्रकल्प आहे. त्याच्यासोबत राणेंच्या या मंत्री पदामुळे कोकणात लघु उद्योग उभे राहतील. पर्यावरण पूरक उद्योग इथे उभे राहिले तर इथला बेरोजगारीचा प्रश्नही सुटेल. नाणार प्रकल्पाला असलेला शिवसेनेचा विरोधही आता कमी होत आहे. काही दिवसांपूर्वीच नाणारच्या परिसरातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रकल्पाच्या बाजूने ठरावही घेतले आहेत. शिवाय सेनेच्या विरोधाला कंटाळून अनेक शिवसैनिक भाजपात गेलेले आहेत. याचाच आता राणेंमुळे विस्तार होऊ शकतो. यातूनच नंतर प्रकल्पाच्या बाजूने मोठे जनमत उभे राहील असेही ते म्हणाले.

भाजप हा कोकणचा बालेकिल्ला होईल

नारायण राणे यांना मिळालेल्या केंद्रीय मंत्री पदाचा प्रभाव तळकोकणातील राजकारणावर पाहायला मिळेल, असे मत सिंधुदुर्गातील राजकीय विश्लेषक पत्रकार महेश सावंत यांनी व्यक्त केले आहे. पूर्वी कोकणात असं चित्र होत की नारायण राणे ज्या पक्षात त्याच पक्षाची कोकणात सत्ता, मात्र मधल्या काळात हे चित्र बदलले. नारायण राणे ज्या-ज्या वेळी मंत्री झालेत त्या वेळी त्यांचे कार्यकर्ते आणखीन आक्रमकपणे काम करताना दिसतात हे त्यांच्या कार्यकर्त्यांचे वैशिष्ट्य आहे. राणे मंत्री असताना कार्यकर्ते जोमाने काम करत असल्याने तळकोकणात अगदी शेवटच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतही ते असलेल्या पक्षाची सत्ता होती. मध्यंतरी त्यांचा हा प्रभाव कमी झाला होता. मालवण, सावंतवाडी विधानसभा शिवसेनेकडे गेल्या. मात्र पुन्हा एकदा त्यांना मंत्रिपद मिळाल्याने त्यांचे कार्यकर्ते चार्ज होतीलच त्याशिवाय राणे देखील या संधीच दसून केल्या शिवाय राहणार नाहीत. पुन्हा एकदा ते तळ कोकणात संघटना अत्यंत मजबुतीने बांधतील. भाजप हा कोकणचा बालेकिल्ला होईल, असेही महेश सावंत म्हणाले.

जिल्हा पुन्हा एकदा विकासकामात अव्व्ल येईल

राणेंच्या निकटवर्तीय कार्यकर्त्या म्हणून ज्यांची ओळख आहे त्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संजना सावंत म्हणाल्या सिंधुदुर्गात विकासाचा ओघ थांबला होता, तो आता नव्याने सुरु होईल. तसेच आपला जिल्हा आता विकासकामात अव्व्ल येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जे जे त्यांनी उपक्रम राबवले ते पुन्हा जोमाने सुरू होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

चिपी विमानतळावर आता विमान उतरेल

नारायण राणे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेल्या कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे म्हणाले की, नारायण राणे केंद्रीय मंत्री झाल्यामुळे पहिल्यांदा मार्गी लागेल ते चिपी विमानतळाचा प्रश्न. या विमानतळाच्या अनेक अडचणी आता दूर होतील आणि या ठिकाणी विमान उतरेल, असा आपल्याला वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील अन्य प्रकल्पही मार्गी लागतील असे सांगतानाच राज्यात त्यांनी जशी जबाबदारी पार पडली तशीच केंद्रातील जबाबदारी देखील पंतप्रधानांनी टाकलेल्या विश्वास सार्थ करत सांभाळतील, असेही ते म्हणाले.

Last Updated : Jul 8, 2021, 12:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details