सिंधुदूर्ग - कोरोनामुळे कोकणातील काजू उद्योग अडचणीत आला आहे. काजू उद्योगाला जीएसटीमधून सवलत मिळाल्याने काजू व्यवसायाला काही प्रमाणात उभारी मिळेल. मात्र कोकणातील काजू बागायतदारांना हमीभाव द्यावा अशी मागणी महाराष्ट्र कॅशु मॅन्युफॅक्चर असोसिएशनने केली आहे.
राज्याच्या तुलनेत कोकणात सर्वाधिक काजू उदयोग आहेत. राज्यात काजू उद्योगातून १८५२ कोटींची उलाढाल होते, मात्र कोरोनाचा काजू उद्योगाला चांगलाच फटका बसला असून, आर्थिक उलाढालीमध्ये घट होऊन, ती 600 ते 700 कोटींवर आली आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी जीएसटीत सवलत दिल्याने यावर्षी काजू उद्योगातून होणारी उलाढाल 2000 कोटीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. मात्र तरी देखील काजू उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने हमीभाव द्यावा, काजू निर्यातीला चालना द्यावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे.
कोकणातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव देण्याची मागणी काजू उद्योगासाठी १०० कोटींच्या तरतुदीची मागणी
येणाऱ्या अर्थसंकल्पात काजू उद्योगासाठी 100 कोटींची तरतूद करावी, महाराष्ट्रातून काजू निर्यातीला परवानगी द्यावी, काजू उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा अशा विविध मागण्या महाराष्ट्र कॅशु मॅन्युफॅक्चर असोसिएशनने केल्या आहेत. या मागण्यासाठी २५ फेब्रुवारी रोजी मुंबई येथील वाशी तिरुपती बालाजी हॉल येथे काजू असोसिएशन यांनी राज्यातील काजू व्यवसायिकांची बैठक बोलावली असून, या बैठकीला अर्थमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री सुभाष देसाई, अदिती तटकरे व आमदार दिपक केसरकर हे उपस्थित राहणार आहेत.
१०० प्रक्रिया उद्योग चालू असतील तर ५०० लोकांना रोजगार
यावेळी बोलताना कॅशु मॅन्युफॅक्चर असोसिएशननेचे बिपीन वरस्कर म्हणाले की, १०० प्रक्रिया उद्योग चालू असतील तर ५०० लोकांना त्यातून रोजगार मिळू शकतो. जास्तीतजास्त रोजगार मिळण्यासाठी एकत्रितपणे काम केलं तर त्याचा जास्त फायदा होईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.