सिंधुदुर्ग- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा फटका सर्वानाच बसला आहे. लग्नसराईचा हंगाम आणि विवाह सोहळेही याला अपवाद नाहीत. मात्र, शासनाच्या नियमांचे उल्लंघन न होऊ देता ठराविक लोकांच्या उपस्थित अनोख्या पद्धतीने एक विवाह सोहळा कुडाळमधील चैतन्य मंगल कार्यालयात पार पडला. लग्नात वऱ्हाडी मंडळींच्या जेवणावर होणार खर्च आश्रमाला दान करण्यात आला.
सामाजिक बांधिलकी पार पडला विवाहसोहळा मालवणमधील महादेव पाटकर व कुडाळमधील योगेश्री देसाई यांचा विवाह सोहळा शासनाचे दिलेल्या सर्व नियम पाळून पार पडला. नववधुचा मित्र परिवार, भटजी मिळून १५ जणांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. नवदाम्पत्य दुचाकीवरून घरी गेले. लग्न सोहळ्यापूर्वी वधू-वरांनी कुडाळ तहसीलदार रवींद्र नाचणंकर यांची रीतसर परवानगी घेतली. शासनाने दिलेल्या अटी शर्ती पुर्ण करून हा विवाह सोहळा संपन्न झाला.
फेब्रुवारी महिन्यात आमच्या लग्नाची बोलणी झाली. त्याच महिन्यात साखरपुडा झाला. मे महिन्याच्या १७ तारखेला लग्न करायचे ठरले. मात्र, आता देशात लॉकडाऊन असल्याने अडचण झाली, तरीही आम्ही ठरलेल्या तारीखला लग्न करायचे ठरवले, असे योगेश्री देसाई हिने सांगितले. शासनाच्या परवानगीने ज्या अटी घातल्या त्या अटींची पूर्तता करत, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत मास्क, सॅनिटायझरचा वापर विवाह सोहळ्यावेळी करण्यात आला.कुठलाही बडेजाव न करता १५ लोकांच्या उपस्थित लग्न केले. अस वेगळ्या पध्दतीने कमी लोकांत लग्न करून समाजात वेगळा संदेशही आम्हाला देण्याची संधी मिळाली, असे योगेश्री देसाई म्हणाली.
लॉकडाऊनमुळे थाटात लग्न करणे शक्य नसल्याने कुडाळ तहसीलदार यांच्याकडून परवानगी घेऊन त्यांनी दिलेल्या नियमांच्या अटीवर लग्न केले. एरवी लग्नात होणारा अवाढव्य खर्च न करता, कुठल्याही प्रकारचा बडेजाव न करता हा विवाह केल्याचे महादेव पाटकर यांनी सांगितले. लग्न कमी खर्चात झाल्याने एक सामाजिक भान डोळ्यासमोर ठेवून माझ्या लग्नाच्या जेवणासाठी होणारा संपूर्ण खर्च कुडाळमधील सविता आश्रमातील अनाथांसाठी मदत होईल या हेतूने अन्नधान्यासाठी दिला असेही पाटकर म्हणाले.