सिंधुदुर्ग -जिल्हा सामान्य रुग्णालयात ट्रुनॅट मशीनव्दारे कोरोनाची तपासणी सुरू झाली आहे. यामुळे जिल्ह्यातच कोरोनाच्या तात्काळ तपासण्या करणे सोपे जाणार आहे. याशिवाय माकडतापाचेही निदान यामुळे होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात ट्रुनॅट मशीनद्वारे स्वॅब तपासणीची परवानगी इंडियन कौंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, दिल्लीकडून (आयसीएमआर) देण्यात आली आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये सध्या ट्रुनॅट एक मशीन व सीबी नॅट कोविड –19 मशीन, अशा दोन मशीन उपलब्ध आहेत. या दोन्ही मशीनव्दारे एका तासात दोन नमुन्यांची तपासणी होऊ शकते. ट्रुनॅट मशीनव्दारे स्वॅब तपासल्यानंतर स्क्रीनींग टेस्ट होऊन निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह स्वॅब रिपोर्ट मिळतो. निगेटिव्ह रिपोर्ट असेल तर तो कर्न्फम रिपोर्ट असतो. पॉझिटिव्ह रिपोर्ट आला तर हा रिपोर्ट कन्फर्म करण्यासाठी सीबी नॅट मशीन किंवा आरटीपीसीआर मशीनमध्ये तपासणीसाठी पाठवणे आवश्यक असते. या दोन्ही मशीनव्दारे स्वॅब टेस्टींग सुरू करण्यात आली आहे. तसेच त्यासाठीचे प्रशिक्षण एनआयबी, पुणे यांचेकडून देण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.
जिल्ह्यातील बहुप्रतिक्षीत माकड तापाचे (केएफडी) निदान करणारी प्रयोगशाळाही कार्यान्वित झालेली आहे.यापूर्वी माकडताप नमुने तपासणीसाठी एनआयबी, पुणे किंवा मणिपाल रुग्णालय, गोवा यांच्याकडे पाठविण्यात येत होते. आता ही लॅब कार्यान्वित झाल्यामुळे हे नमुने स्थानिक पातळीवर तपासता येणार आहेत. तसेच या लॅबमध्ये लेप्टोस्पायरोसिस, डेंग्यू आणि चिकुन गुनिया या आजारांची तपासणी करता येणार आहे. यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाचे प्रशिक्षण एनआयबीकडून देण्यात आहे. यासाठी लागणारे इतर मशिन्स लवकरच प्राप्त होणार आहेत.