सिंधुदुर्ग - जिल्ह्यात तीन ठिकाणी तीन नवे ऑक्सिजन प्लांट उभारण्यासह जिल्ह्यासाठी 20 नवे व्हेंटिलेटर खरेदी करण्यात येणार आहेत. याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. कुडाळ, कणकवली, सावंतवाडी या ठिकाणी नवे ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार आहेत.
कुडाळ, कणकवली, सावंतवाडी या ठिकाणी नवे ऑक्सिजन प्लांट -
कुडाळ येथील महिला रुग्णालय येथे 1 हजार लिटर प्रति मिनीट, कणकवली येथे 500 लीटर प्रति मिनीट आणि सावंतवाडी येथे 500 लीटर प्रति मिनीट क्षमतेचे ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार आहेत. तसेच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आणखी 20 व्हेंटिलेटर खरेदी करण्याचा निर्णय पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड बाबतच्या आढावा बैठकीवेळी हा निर्णय घेण्यात आला. ऑनलाईन पद्धतीने घेतलेल्या या बैठकीला खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, आमदार नितेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
सरपंच आणि उपसरपंच यांनाही विमा कवच -
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आणि शहरात अनावश्यक फिरणाऱ्या व्यक्तींच्या कोरोना चाचणी कराव्यात, अशा सूचना देऊन पालकमंत्री उदय सामंत पुढे म्हणाले की, रुग्णांना भेटायला येणाऱ्या नातेवाईकांच्या आरटीपीसीआर चाचण्या कराव्यात. नातेवाईक रुग्णांना भेटायला येणार नाहीत अशी व्यवस्था जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी करावी. आवश्यकता असेल त्या ठिकाणी शिवभोजन केंद्र सुरू करण्यासंदर्भात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भूजबळ यांच्याशी चर्चा करणार, आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी शिक्षकांचा समावेश करून जी आरोग्य यंत्रणेशी संबंधित कामे नाहीत ती शिक्षकांना देण्यात येणार, सरपंच आणि उपसरपंच यांनाही विमा कवच असावे यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार करावा. असे यावेळी ठरविण्यात आले.
जिल्ह्या बाहेरून येणाऱ्यांना आरटीपीसीआर किंवा रॅपिड अँटीजेन टेस्ट करणे सक्तीची
जिल्ह्या बाहेरून येणाऱ्यांना आरटीपीसीआर किंवा रॅपिड अँटीजेन टेस्ट करणे सक्तीची असेल, लसीकरण वाढवावे, 45 वर्षे वयावरील पत्रकरांची यादी करून त्यांच्यासाठी कॅम्प घेण्यात यावा. ग्राम कृती समिती कार्यान्वीत करण्यात आली आहे. त्यामध्ये तलाठी व पोलीस पाटील हे सक्रीय नसतील तर जिल्हाधिकारी यांनी त्यांच्यावर कारवाई करावी. गृह अलगीकरणात असलेल्या रुग्णांची दररोज तपासणी करण्यात यावी, तालुका स्तरावर तात्काळ लागणाऱ्या रुग्णवाहिका भाड्याने घेण्यात याव्यात, नगर पालिका सफाई कामगारांसाठी पीपीई कीट उपलब्ध करून देण्यात येणार, जेथे आवश्यकता आहे तेथे तालुका स्तरावर खाजगी रुग्णालये अधिग्रहीत करावीत. शासकीय इमारती, रुग्णालये नवीन पद्धतीने कशी सॅनिटाईज करता येतील याचा जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी तपास करावा, कंटेन्मेंट झोनमध्ये मोठे बॅनर लावावेत, घरांवरही मोठे बॅनर लावावेत असे यावेळी ठरविण्यात आले.
नगर पालिकेला 5 लाख, नगर पंचायतीला 3 लाख रुपये देण्यात येणार
प्रत्येक नगर पालिकेला 5 लाख रुपये आणि नगर पंचायतीला 3 लाख रुपये देण्यात येणार आहे. नगर पालिकांमध्ये सेमी विद्युत दाहिनी व प्राधिकरणामध्ये पूर्ण विद्युत दाहिनी घेण्यात येणार असे निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आले. तर जिल्ह्यातील कोवीड प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व लोक प्रतिनिधींनी सहकार्याची भूमिका घेतली आहे. जिल्हा प्रशासनही त्यासाठी काम करत आहे. अत्यावश्यक असेल तरच लोकांनी घराबाहेर पडावे. कोरोनाचे संकट हे सर्वांवरच आहे. जिल्ह्यात उद्यापासून पोलीस कडक कारवाई सुरू करणार आहेत. जनतेने याची दखल घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहनही पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी केले.