सिंधुदुर्ग :सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास सावंतवाडी तालुक्यातील मळगाव बाजारपेठेतून जाणार्या एका कंटेनरमधून आरडाओरडीचा आवाज ऐकू आला. तसेच 'दरवाजा खोलो' असे आतील लोक ओरडत असल्याचे बाहेर ऐकू आले. त्याठिकाणी असलेल्या लोकांना आत काही तरी काळेबेरे असल्याचा संशय आल्याने त्यांनी तात्काळ तो कंटेनर रोखला. यावेळी त्यात मुली आणि मुले दिसून आली. मात्र त्यातील मुलींनी तोंड बांधून ठेवल्यामुळे त्या ठिकाणी जमलेल्या लोकांचा संशय आणखीच बळावला. यावेळी त्यांनी काही राजकीय पदाधिकार्यांना त्या ठिकाणी पाचारण केले. तसेच हा प्रकार तस्करीचा असल्याचे सांगून पोलिसांना त्या ठिकाणी बोलाविण्यात आले.
नागरिकांच्या सतर्कतेमुळे चौकशी :पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन झालेला प्रकाराची चौकशी करण्यास सुरवात केली. यावेळी पोलिसांनी गाडीसह त्या सर्वांना ताब्यात घ्यावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली. त्यानुसार सर्वांना कंटेनरसह पोलीस ठाण्यात आणण्यात आले. यावेळी त्या ठिकाणी जमलेल्या सर्वपक्षीय तसेच विविध संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली. त्यानुसार पोलिसांनी चौकशी केली असता तालुक्यात झालेल्या एका लग्नात जेवण वाढण्यासाठी संबधित मुलांना बोलाविण्यात आले होते. काल एका ठिकाणी एक पार्टी झाली. तर आज दुसर्या ठिकाणी पार्टी असल्यामुळे ती मुले या कंटेनरमधून नेली जात होती, अशी माहिती तपासात उघड झाली.