सिंधुदुर्ग - जिल्ह्यात गेले दोन दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने मध्यरात्री पासून दमदार हजेरी लावली. आज सर्वत्र सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. कणकवली ते मालवण सर्जेकोट अशी वाहणारी गड नदी दुथडी भरून वाहत होती. त्यामुळे नदीकिनारच्या गावात पाणी भरले. तर कणकवली आचार मार्गावर पाणी आल्याने रस्ता वाहतुकीला बंद करण्यात आला होता. जिल्ह्यात ७ जुलैपर्यंत अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस, अनेक गावांचा संपर्क तुटला
जिल्ह्यात गेले दोन दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने मध्यरात्री पासून दमदार हजेरी लावली. आज सर्वत्र सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. कणकवली ते मालवण सर्जेकोट अशी वाहणारी गड नदी दुथडी भरून वाहत होती. त्यामुळे नदीकिनारच्या गावात पाणी भरले.
आज सावंतवाडीत सर्वाधिक पाऊस झाला. तर जिल्ह्यात 300 मिमी पावसाची नोंद झाली आहे. अजूनही पावसाची सततधार सुरूच आहे. कुडाळ मधील मुंबई-गोवा महामार्गावरील भंगसाळ नदीलाही मोठा पूर आलाय. तर कुडाळ-माणगाव येथील आंबेरी पूल देखील पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे कुडाळमधील 27 गावांचा संपर्क तुटला आहे. कणकवली गड नदीला पूर आल्याने महामार्गावरील वागदे गावातील काही घरांना पाण्याने वेढले होते. सात्रळ गावाकडे जाणारा मार्ग बंद झाल्याने पुढील १० गावांचा संपर्क तुटला आहे. मालवण मसुरे गावातील शेती पाण्याखाली गेली होती. खारेपाटण सुक नदीला पूर आल्याने येथील बाजारपेठेत पाणी घुसले होते.
प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्या माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८ व ९ जुलै रोजी अतिमुसळधार पाऊस होणार आहे. १० जुलै रोजी मुसळधार पाऊस तर ११ जुलैला पुन्हा मुसळधार पाऊस होणार आहे. तसेच ८ जुलै रोजी रात्री ११.३० पर्यंत मालवण ते वसई या समुद्र किनारी ३.० ते ४.६ मिटर उंचीच्या लाटा उसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वेंगुर्ला ते वास्को या समुद्रकिनारी ८ जुलै रोजी रात्री ११.३० पर्यंत २.९ ते ४.२ मिटर उंचीच्या लाटा उसळण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्या अनुषंगाने आवश्यक खबरदारी घेण्यात यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाकडून करण्यात आले आहे.