सिंधुदुर्ग - कोंड नेस्ट ट्रॅव्हलर या मॅगझिनने यंदाच्या वर्षी भेट देण्यासाठी जगातील 30 सर्वात सुंदर पर्यटन स्थळांची यादी ( Cond Nest Traveler Beautiful Tourist Place List ) जाहीर केली आहे. यामध्ये लंडन, सिसिली, सिंगापूर यासह इस्तंबूल, इजिप्त, माल्टा, सर्बिया, केपवर्दे अशा आंतरराष्ट्रीय तसेच सिक्कीम, मेघालय, ओरिसा, राजस्थान, गोवा, कोलकाता, भिमताल, केरळमधील आयमानम अशा भारतीय 9 पर्यटन स्थळांत महाराष्ट्रातील एकमेव सिंधुदुर्गचा समावेश ( Sindhudurg In Beautiful Tourist Place List ) केला आहे. जगातील सर्वात सुंदर 30 पर्यटन स्थळांच्या यादीमध्ये सिंधुदुर्गचा समावेश असणे ही खरोखरच आपल्यासाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिली.
महाराष्ट्रातील एकमेव सिंधुदुर्ग जिल्हा -
कोंड नेस्ट ट्रॅव्हलर, इंडिया हे एक मॅगझिन तसेच वेबसाईट असून दरवर्षी जगातील सुंदर पर्यटन स्थळांची यादी ते प्रसिद्ध करतात. त्यामध्ये या पर्यटन स्थळांची संपूर्ण माहिती दिली जाते. जागतिक स्तरावरील पर्यटनास चालना देण्यासाठी त्यांच्याकडून हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो. यंदाच्यावर्षी भेट देण्यासाठी निवडण्यात आलेल्या 30 पर्यटन स्थळांमध्ये भारतातील 9 स्थळांचा समावेश आहे. त्यापैकी महाराष्ट्रातील एकमेव सिंधुदुर्ग जिल्हा आहे. या यादीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड होणे म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय दर्जाचा जिल्हा असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे.