सिंधुदुर्ग -लोकसंख्येच्या प्रमाणावर समुद्राच्या उच्चतम भरतीपासून ५० मीटर अंतर संरक्षित करण्याचा निर्णय घातक आहे. जिल्ह्यातील एकूण जमिनीच्या ८० टक्के जमीन ही वने, इको सेन्सिटिव्ह व आता सीआरझेडसाठी (कोस्टल रेग्युलेशन झोन) आरक्षित झाली आहे. त्यामुळे या जिल्ह्यात उद्योग, कंपन्या येऊ शकत नाहीत. सीआरझेडसाठी २०१४मध्ये सॅटेलाईट सर्व्हे करण्यात आला आहे. तो वस्तुस्थितीला धरून नाही. २०१४नंतर यात मोठा विकासात्मक बदल झालेला आहे. यामुळे सर्व्हे करणाऱ्या संस्थेने पुन्हा सर्वेक्षण करावे, अशा विविध तक्रारी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी सीआरझेड ऑनलाइन सुनावणीत मांडल्या. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने सीआरझेडची सुनावणी पूर्ण झाल्याचे जाहीर केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात ही ऑनलाइन सुनावणी घेण्यात आली. यावेळी सभागृहात जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, महाराष्ट्र कोस्टल झोनचे प्रकल्प अधिकारी रुपेश महाले यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक तसेच सर्व्हे संस्थेचे डॉ. माणिक व महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाचे डॉ. शिर्टीकर हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते.
सुधारित सीआरझेड प्रारूप आराखड्याबाबत स्पष्ट माहिती मिळत नसल्याने आमच्यात संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, आता प्रकल्प अधिकारी महाले यांनी दिलेल्या माहितीमुळे चांगला खुलासा झाला आहे. जिल्ह्यातील ८० टक्के क्षेत्र आकारीपड, वनसंज्ञा, संस्थान, इको सेन्सिटिव्ह व आता सीआरझेड यामुळे आरक्षित झाले. त्यामुळे जिल्ह्यात तीव्र संतापाची भावना उमटत आहेत, असे खासदार राऊत यांनी सांगितले.