सिंधुदुर्ग - जिल्ह्यात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आज पालकमंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांनी आढावा घेतला. या नुकसानीची पाहणी करायला दोन दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार असल्याचे पालकमंत्री सामंत यांनी सांगितले.
दोन दिवसात मुख्यमंत्री सिंधुदुर्ग दौऱ्यावर - पालकमंत्री उदय सामंत
सिंधुदुर्ग जिल्ह्यात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आज पालकमंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांनी आढावा घेतला. या नुकसानीची पाहणी करायला दोन दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार असल्याचे पालकमंत्री सामंत यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी झाली चर्चा
चक्रीवादळाचा सर्वात जास्त फटका वैभववाडी तालुक्याला बसला असून, तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्याच्या तहसीलदारांनी युद्धपातळीवर पंचनामे केले असल्याचे त्यांनी सांगितले. या वादळामध्ये साडेसातशे घरांचे नुकसान होऊन त्यांची, पडझड झालेली आहे. आंबा व काजू बागायतदारांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी वैभवाडीतील नुकसानीचा आढावा घेतला. जिल्ह्यातील सर्व नुकसानीबाबत खासदार विनायक राऊत व मी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.
सिंधुदुर्गवासियांना मदत करण्याची विनंती
निसर्ग वादळाच्या पार्श्वभूमीवर शासनाने जो काही जी. आर. काढला होता, त्याचप्रमाणे तो आता पुन्हा काढून लाइव्ह करावा, अशी मागणी आपण मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. त्याचप्रमाणे सिंधुदुर्गवासियांना मदत करावी अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे सांगितले. फक्त प्रशासनाच्या मदतीवर आम्ही थांबलो नसून, शिवसेना पक्षामार्फत मदत करायला सुरुवात केल्याचेही उदय सामंत म्हणाले. नुसत्या मदतीची घोषणा केली नसून, त्याची परिपूर्तता आज संध्याकाळपर्यंत होणार असल्याचेही ते म्हणाले. प्रशासनाच्या मदतीला ७ ते ८ दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे ते म्हणाले. परंतु, तात्काळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना पत्रे, ताडपत्री अशा आवश्यक साधनांची पूर्तता शिवसेना पक्षामार्फत करणार असल्याचेही सांगितले. ज्या गावांमध्ये नळपाणी योजना ठप्प झालेली आहे. त्या ठिकाणी तत्काळ जनरेटर उपलब्ध करून नळपाणी योजना सुरळीत सुरू करणार असल्याचे सामंत यावेळी म्हणाले.
दोन्ही जिल्ह्यात बागायतदारांचे मोठे नुकसान - खासदार राऊत
पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली जी बैठक झाली त्या बैठकीत जे काही नुकसान झाले त्यांचे तातडीने पंचनामे करावे. आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर करण्याचे आदेश पालकमंत्री यांनी दिले आहेत, असे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यात फळ बागायतीचे मोठे नुकसान झाले आहे. या दोन्ही जिल्ह्यातील नुकसानग्रस्त बागायतदारांना मदत मिळवून देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असेही ते यावेळी म्हणाले.