सिंधुदुर्ग :किल्ले सिंधुदुर्ग येथे पर्यटनासाठी आलेल्या सातारा येथील ४० जणांच्या महिला पर्यटक ग्रुपकडून दादागिरी, दमदाटी व अतिरेक केल्याचा प्रकार घडला आहे. किल्ले सिंधुदुर्ग येथे वायरी भुतनाथ ग्रामपंचायत माध्यमातून पर्यटन करवसुली घेण्याच्या विषयावरून वाद भडकला. ५ रुपये कर भरणार नाही, असे सांगत महिला पर्यटक ग्रुपने करवसुली करणाऱ्या दोघा महिला कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की व मारहाण केल्याची घटना घडली. याबाबत व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
कर वसुलीचे काम :मालवणच्या समुद्रातील ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग हा वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत येत असल्याने किल्ला दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांकडून ग्रामपंचायतीकडून कर वसूल केला जातो. या करवसुलीचा स्टॉल सिंधुदुर्ग किल्ल्यात असून त्यावर कंत्राटी पद्धतीने दोन महिला कर्मचारी करवसुलीचे काम करतात. सातारा येथील पर्यटकांचा ग्रुप किल्ला दर्शनासाठी आला असता स्टॉलवरील महिला कर्मचाऱ्यांनी कर भरण्यास सांगितले. कर भरण्यास नकारारावरून वाद चिघळला गेला. तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
कर भरण्यास नकारारावरून वाद :पर्यटकांनी कर भरण्यास नकार दिल्याने वाद भडकला. यावेळी त्या पर्यटकांनी दोन्ही कर्मचारी तरुणींना धक्काबुक्की करत मारहाण केली. महिला कर्मचाऱ्यांनी याबाबतची माहिती ग्रामपंचायतीला कळविली. यानंतर किल्ल्यावरून ते पर्यटक व तरुणी होडीतून बंदर जेटी येथे परतल्यावर पुन्हा बंदर जेटी येथे दोन गटात वाद झाला. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध पक्षाचे आजी माजी पदाधिकारी यावेळी दाखल झाले.