पणजी : राज्यात मागच्या काही महिन्यांपासून बंद असलेले पर्यटन हळूहळू सुरू होत आहे. सरकारने मागील आठवड्यात कॅसिनो सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे गोवा राज्यात पुन्हा एकदा पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. राष्ट्रीय पर्यटन सुरू झाल्यानंतर राज्यातील हॉटेल व पर्यटन क्षेत्राला आता वेध लागले आहे ते आंतरराष्ट्रीय पर्यटन सुरू होण्याचे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही याबाबत अनुकूलता दर्शवत राज्यात आंतरराष्ट्रीय पर्यटन सुरू करण्यासाठी केंद्र सरकार व गृह विभागाकडे परवानगी मागितली आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या परवानगीने राज्यात लवकरच चार्टर्ड विमाने उतरून आंतरराष्ट्रीय पर्यटन सुरू होणार असल्याचे संकेत प्रमोद सावंत यांनी दिले आहेत.
पर्यटन क्षेत्रासाठी सरकारच्या अनेक सवलती
राज्यात पर्यटनाला कोविड महामारीनंतर पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी सरकारने हॉटेल व्यवसायिकांना पुन्हा एकदा नव्याने हॉटेल सुरू करण्यासाठी नोंदणी व करात ५० टक्के सवलत दिली आहे. तसेच राज्यातील टुरिस्ट गाईड व स्टेक्क होल्डर यांना अनुक्रमे १ लाख व १० लाखांचे अनुदान केंद्र सरकारच्या वतीने देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
राज्यात पॉलिटिकल टुरिझम
राज्यात आगामी ५ महिन्यात विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे अनेक पक्षांचे राष्ट्रीय नेते गोव्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे सर्व पर्यटनासोबत राज्यात पॉलिटिकल टुरिझम सुरू झाले आहे. आपण सर्व नेत्यांचे गोव्यात स्वागत करत आहे, असा मिश्किल टोला मुख्यमंत्र्यांनी आप, काँग्रेस व तृणमूलच्या राष्ट्रीय नेत्यांना लगावला आहे.