महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सरकारी काम.. केंद्रीय समितीकडून तब्बल २१ दिवसानंतर नुकसानग्रस्त भागाची पाहणी - केंद्रीय समिती सिंधुदुर्गात दाखल

सिंधुदुर्ग जिल्ह्याला तौक्ते वादळाने तडाखा दिल्यानंतर तब्बल २१ दिवसानंतर येथील नुकसानीच्या पाहणीसाठी जिल्ह्यात दाखल झालेल्या केंद्रीय समितीने आज देवगड, मालवणला भेट दिली. कडेकोट पोलीस बंदोबस्तात किनारपट्टी भागातून गाड्यांच्या ताफ्यातून धावत्या भेटी देऊन या समितीने पाहणी केली.

Central Committee
Central Committee

By

Published : Jun 6, 2021, 9:33 PM IST

Updated : Jun 7, 2021, 6:50 AM IST

सिंधुदुर्ग - जिल्ह्याला तौक्ते वादळाने तडाखा दिल्यानंतर तब्बल २१ दिवसानंतर येथील नुकसानीच्या पाहणीसाठी जिल्ह्यात दाखल झालेल्या केंद्रीय समितीने आज देवगड, मालवणला भेट दिली. कडेकोट पोलीस बंदोबस्तात किनारपट्टी भागातून गाड्यांच्या ताफ्यातून धावत्या भेटी देऊन या समितीने पाहणी केली. पंचनाम्याचे अहवाल केंद्राकडे सादर करणार, अशी माहिती यावेळी समिती अध्यक्ष अशोक परमार यांनी दिली.

समितीच्या मार्गावर कडक पोलीस बंदोबस्त -

दरम्यान जिल्ह्यात वादळामुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचा अहवाल आपण केंद्राकडे सादर करणार असल्याची माहिती यावेळी केंद्रीय समितीचे अध्यक्ष अशोक परमार यांनी दिली. तौक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय समिती जिल्ह्यात दाखल झाली. आज या समितीने देवगड, मालवण तालुक्यातील किनारी भागातील नुकसानीची पाहणी केली. अनेक गाड्यांचा ताफा घेऊन पाहणीसाठी फिरणाऱ्या या समितीच्या मार्गावर कडक पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.

केंद्रीय पथक सिंधुदुर्गात दाखल
देवगड व मालवण तालुक्यात पाहणी -
देवगड तालुक्यातील विजयदुर्ग, कुणकेश्वर, मुणगेसह या केंद्रीय समितीच्या सदस्यांनी आचरा, मालवण, चिवला बीच, वायरी, तारकर्ली, देवबाग या नुकसानग्रस्त भागांना भेट दिली. या समितीमध्ये अर्थविभागाचे प्रमुख अभय कुमार, केंद्रीय कृषी खात्याचे सिंग, ऊर्जा विभागाचे प्रमुख जे.के. राठोड, केंद्रीय मत्स्य विभागाचे प्रमुख अशोक कदम यांचा समावेश होता. यावेळी तत्कालीन प्रांताधिकारी तुषार मठकर, मालवण-कुडाळचे प्रांताधिकारी वंदना खरमाळे, तहसीलदार अजय पाटणे आदी उपस्थित होते. मालवण येथे चिवला किनाऱ्याची पाहणी करून समिती सदस्यांनी मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर व वीज वितरणच्या अभियंता सौ. गिरकर यांच्याशी चर्चा केली.
खराब झालेले पोलही इतर कालावधीत बदलून घेण्याची सूचना -
केवळ वादळामुळे नुकसानी झाल्यावरच वीज पोल न बदलता खबरदारी म्हणून खराब झालेले पोलही इतर कालावधीत बदलून घेण्याची सूचना समिती सदस्यांनी केली. नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी मालवण हे समुद्र किनारी वसलेले असल्याने वीज पोलांना गंज लागून ते खराब होण्याचे प्रमाण जास्त असल्याचे सांगत ही बाब निदर्शनास आणून दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तौक्ते वादळामुळे मोठी हानी झाली आहे. यामुळे झालेल्या नुकसानीचे शासकीय यंत्रणेने योग्य ते पंचनामे केले आहेत का ? याची पडताळणी करण्यासाठी केंद्रीय समितीचा दौरा असून याचा योग्य तो अहवाल केंद्राकडे सादर करण्याचे समिती अध्यक्ष अशोक परमार यांनी सांगितले.
Last Updated : Jun 7, 2021, 6:50 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details