सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील मंडप, साउंड, कॅटरिंग व्यावसायिकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले आठ महिने या व्यावसायिकांचे व्यवसाय पूर्णतः बंद आहेत. हे बंद असलेले असलेले मंडप, लाईट ,साऊंड, इव्हेंट, केटरिंग व्यवसाय पूर्ववत सुरू करण्यास परवानगी द्यावी. अशी मागणी या व्यावसायिकांनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे केली आहे.
जिल्ह्यातील मंडप साउंड कॅटरिंग व्यावसायिक बसले उपोषणाला - कोरोनाचा कॅटरिंग व्यावसायावर परिणाम
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून गेले आठ महिने मंडप, लाईट, साऊंड, इव्हेंट, केटरिंग व्यवसाय पूर्णपणे बंद झालेले आहेत. यामुळे या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे अनेकांचे कर्जाचे हप्ते थकले आहेत. त्यामुळे बंद असलेले मंडप, लाईट साउंड, केटरिंग व्यवसाय सुरू करण्यात यावेत, यासाठी आंदोलन करण्यात आले.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून गेले आठ महिने मंडप, लाईट, साऊंड, इव्हेंट, केटरिंग व्यवसाय पूर्णपणे बंद झालेले आहेत. यामुळे या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे अनेकांचे कर्जाचे हप्ते थकले आहेत. त्यामुळे बंद असलेले मंडप, लाईट साउंड, केटरिंग व्यवसाय सुरू करण्यात यावेत. संबंधित व्यवसायिकांचा रोजीरोटीचा प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक निर्णय घ्यावा. यासह विविध मागण्यांसाठी सिंधुदुर्ग जिल्हा मंडप लाईट केटर्स असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११ ते सायंकाळी ४ पर्यंत लाक्षणिक उपोषण करण्यात आले. तसेच मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू करण्यात आलेल्या लाक्षणिक उपोषण आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा मंडप लाईट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष प्रणव तेली यांनी केले. या आंदोलनात असोसिएशनचे उपाध्यक्ष आबा कोटकर, सचिव चंद्रकांत मुंज, यांच्यासह सुनील आजगावकर, अनिल वाळके, श्रीराम शिरसाट यांच्यासह जिल्ह्यातील शेकडो व्यवसायिक सहभागी झाले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंडप डेकोरेटर व्यवसायिकांनी आंदोलनाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांची लक्ष वेधले. त्यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी विविध मागण्या केल्या आहेत.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा मंडप लाईट साऊंड केटर्स असोसिएशनच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या आंदोलनाला आमदार वैभव नाईक यांनी भेट दिली. त्यांच्या समस्या जाणून घेत त्यांच्या मागण्या बाबत आपण जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांच्याशी चर्चा करून येत्या आठ दिवसात तोडगा काढू, असे आश्वासन दिले. तसेच राज्यस्तरावर जे निर्णय होणे आवश्यक आहेत त्याबाबत मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधू, असे आमदार वैभव नाईक यांनी आंदोलनकर्त्यांना सांगितले.
काय आहेत प्रमुख मागण्या?
सर्व प्रकारच्या सामाजिक कार्यक्रमांमध्ये मंडप, लॉन, मंगल कार्यालय, हॉलच्या क्षमतेपेक्षा अर्ध्या लोकांच्या आसन क्षमतेची परवानगी देण्यात यावी किंवा पाचशे व्यक्तींच्या उपस्थित कार्यक्रम घेण्याची परवानगी देण्यात यावी, केटरर्स व्यवसायिकांनी साहित्य ठेवण्यासाठी गोदाम, मंगल कार्यालय भाड्याने घेतली आहेत. तरी कोरोना परिस्थिती सामान्य होईपर्यंत त्यांचे भाडे घेऊ नये असे निर्देश कायद्यात समाविष्ट करावेत. या व्यवसायासाठी ज्यांनी कर्ज घेतले आहे त्यांचे व्याज माफ करावे. तसेच महिन्याचा कर्जाचा हप्ता कोरोना स्थिती सामान्य होईपर्यंत चालू करण्यात येऊ नये, इव्हेंट मॅनेजमेंट ,मंडप, लाईट, केटर्स या व्यवसायाशी संबंधित सर्व व्यवसाय धारकांनी घेतलेल्या कर्जावर सबसिडीची तरतुद करावी, अशा मागण्या या व्यावसायिकांनी केल्या आहेत.