सिंधुदुर्ग -कुडाळ येथे भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राडा प्रकरणी आमदार वैभव नाईक यांच्यासह सेना-भाजपच्या 40 कार्यकर्त्यांवर कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हेही वाचा -सर्वसामान्य जनतेला १०० रुपयात दोन लिटर पेट्रोल; भाजप सदस्यांना एक लिटर मोफत पेट्रोल
शिवसेना वर्धापनदिनी झाला होता राडा
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेच्या 55 व्या वर्धापनदिनानिमित्त कुडाळ येथील भारत प्रेट्रोल पंपवर 100 रुपयांत 2 लिटर पेट्रोल देण्यात येणार होते. तर, भाजपचे सदस्य असल्याचे ओळखपत्र असल्यास ते दाखवल्यास त्यांना 1 लिटर मोफत पेट्रोल देण्यात येईल अशीही घोषणा आमदार वैभव नाईक यांनी केली होती. काल सकाळी 11 ते दुपारी 1 च्या दरम्यान हे पेट्रोल देण्यात येणार होते. 11 वाजता आमदार वैभव नाईक भारत पेट्रोल पंपवर आले तेव्हा त्या ठिकाणी आधीपासूनच भाजपचे कार्यकर्ते जमा झाले होते. भाजप कार्यकर्ते व आमदार वैभव नाईक यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली, त्यानंतर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते भिडले.
दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून जमावबंदीचे उल्लंघन
यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जमावबंदीचे उल्लंघन केले. याप्रकरणी सेनेचे आमदार वैभव नाईक यांच्यासह सेना-भाजपच्या 40 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कुडाळ पोलीस स्थानकात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आणि जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 141, 143, 149, 188, 269, 270 या कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हेही वाचा -सिंधुदुर्गात शिवसेना-भाजपा आमने सामने, कुडाळमध्ये पोलीस छावणीचे स्वरूप