सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या खासदार विनायक राऊत यांच्या तळगाव गावातील एका मैदानात बैलांची झुंज आयोजित करण्यात आली होती. या झुंजीमध्ये एका बैलाचा जखमी होऊन मृत्यू झाला. सध्या सोशल मीडिया मधून या झुंजीचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. मन हेलावून टाकणारे आणि अंगावर काटा उभा करणारे असे हे व्हिडिओ असून, यातील एका बैलाच्या मृत्यूप्रकरणी मुंबईचे माजी महापौर शिवसेना नेते दत्ता दळवी यांच्यासह बारा जणांवर जिल्हा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Bull Fight in Sindhudurg : बैल झुंजीत बैलाचा मृत्यू, शिवसेनेच्या माजी महापौरांवर गुन्हा दाखल - बैलांची झुंज मालवण
झुंजीमध्ये एका बैलाचा जखमी होऊन मृत्यू झाला. सध्या सोशल मीडिया मधून या झुंजीचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. मन हेलावून टाकणारे आणि अंगावर काटा उभा करणारे असे हे व्हिडिओ असून, यातील एका बैलाच्या मृत्यूप्रकरणी मुंबईचे माजी महापौर शिवसेना नेते दत्ता दळवी यांच्यासह बारा जणांवर जिल्हा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कडक कारवाई करणार - झुंजीप्रकरणात कोणीही असले तरी पोलीस धडक कारवाई करतील, असा इशारा जिल्ह्याचे उपपोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिला आहे. यावेळी बोलताना नितीन बगाटे म्हणालेत सिंधुदुर्ग जिल्ह्या सारख्या अत्यंत शांतताप्रिय जिल्ह्यात अमानवी पद्धतीने बैलांच्या झुंजी खेळवल्या गेल्या आणि त्यातून ही दुःखद घटना घडली याबाबत, मी खेद व्यक्त करत आहे. मी स्वतः आणि अन्य पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर भेट दिलेली आहे. या झुंजीच्या आयोजनात असलेल्या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्हा पोलीस या घटनेचा तपास करत असून, असे अमानवी कृत्य करताना कोणी आढळल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल असे ते म्हणाले आहेत.
काय होती ही घटना -मालवण तळगाव येथील एका मैदानात कुडाळ आणि वेंगुर्ले येथील दोन बैलाची झुंज आयोजित करण्यात आली होती. ही झुंज तब्बल एकतास सुरू होती. या झुंजीत वेंगुर्ले तालुक्यातील आसोली गावातील विकी केरकर नामक व्यक्तीच्या मालकीचा बैल झुंजी दरम्यान जखमी झाला होता. त्या बैलाचा अखेर मृत्यू झाला आहे. बैल झुंजीला सुप्रीम कोर्टाची बंदी असताना हजारो लोकांच्या उपस्थितीत येथील खासदार विनायक राऊत यांच्या गावात घेण्यात आलेल्या या बैल झुंजीला परवानगी दिली कोणी असा प्रश्न उपस्थित होत आहे. झुंजीत विजयी झालेला बैल हा कुडाळ नेरूर गावातील एका शिवसेनेच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्याचा होता म्हणून पोलीस गप्प होते का? असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडला आहे. सध्या सोशल मीडियावर या झुंजीचे व्हिडिओ व्हायरल होत असून या मुक्या जनावरांचे विव्हळणे मन हेलावून टाकणारे आहे.