सिंधुदुर्ग - कोकणात मसाला पिकांची शेती सुरू केली, तर शेतकऱ्यांच्या नगदी उत्पन्नात नक्की वाढ होईल. यासाठीच देवगड तालुक्यातील पोयरे गावातील शेतकरी राजन राणे सध्या मेहनत घेत आहेत. गेली ५ वर्षे ते प्रयोग करत असून, त्यांना अपेक्षित यशही आले आहे. त्यांनी कोकणात प्रथमच बुश पेपर मिरीची व्हर्टिकल गार्डन पद्धतीने लागवड केली आहे. आपल्या घराच्या अंगणातही या पद्धतीने मिरीचे उत्पन्न घेऊ शकतो, असे राणे यांचे म्हणणे आहे. त्यांच्या काळ्या मिरीच्या शेतीची चांगलीच चर्चा आहे.
बुश पेपर वनस्पतीची लागवड करणे शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे. काळी मिरी जवळपास 5 ते 6 मीटरपर्यंत उंच वाढते. मात्र, बुश पेपरमुळे काळ्या मिरीची उंची नियंत्रित होऊन तिचे मुबलक उत्पादन घेणे आणि उत्पन्न वाढवणे सोपे जाणार आहे. प्रामुख्याने अन्य झाडांच्या आधाराने वाढणारी वेलवर्गीय मिरी धरल्यानंतर काढताना अनेकवेळा शेतकऱ्यांना अपघात झाले आहेत. मात्र, बुश पेपर मिरीमुळे 'मिरीची काढणी' सोप्पी जाते. शिवाय एकावर एक कुंड्या रचून लागवड केली असल्यामुळे जास्त रोप लावता येतात व उत्पादनही अधिक मिळते.