सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील वैभववाडी नगरपंचायतीमधील भाजपचे सहा नगरसेवक शिवसेनेत गेले. या नगरसेवकांचा पक्षप्रवेश मंगळवारी संध्याकाळी मातोश्रीवर पार पडला. मात्र, यानंतर वैभववाडीत भाजपच्या नेत्यांनी हे नगरसेवक पक्ष सोडून गेल्याचा फटाके वाजवत आणि एकमेकाला पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडीत भाजपा नगरसेवक शिवसेनेत गेल्याने भाजपचाच जल्लोष भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडले -
भाजपच्या कार्यकर्त्यांनी वैभववाडी चौकात फटाके फोडले. पेढे वाटून आनंद साजरा केला. संबंधित नगरसेवक शिवसेनेत गेल्यामुळे आता वैभववाडी शहर स्वच्छ झाले. आमदार नितेश राणे यांनी चिखल-माती तुडवत त्या गद्दारांना मागील निवडणुकीत निवडून आणले. मात्र, तरीही हे नगरसेवक शिवसेनेत गेले, अशी प्रतिक्रिया भाजपच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकांचा केला निषेध -
वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीत आम्ही 17 पैकी 17 जागा जिंकणार आणि गद्दारांना धडा शिकवणार, असा दावा भाजपच्या नेत्यांनी केला. वैभववाडीतील मुख्य चौकात जोरदार घोषणाबाजी करत शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकांचा निषेध करण्यात आला. या सहा नगरसेवकांच्या पक्षप्रवेशानंतर शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी शिवसेनेला इशारा दिला. कोणी किती वल्गना केल्या तरी शिवसेना संपणार नाही, असे त्यांनी म्हटले.
14 कोटींचं काम शिवसेना करुन दाखवेल -
भाजप हा देशातील मोठा पक्ष आहे. हा एका कुणाचा पक्ष नाही. तो संघटनेचा आणि कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, असं त्यांच्या एका नेत्याने वक्तव्य केले होते. मात्र, निवडणुकीनंतरच कोण जिंकेले ते दिसेले. आज पक्षप्रवेश झालेला आहे. नगरपालिकेत 14 कोटींचं काम शिवसेना करुन दाखवेल. ते काम झाल्यानंतर वैभववाडीची नगरपंचायत शंभर टक्के शिवसेनेच्या ताब्यात येईल, असा दावा उदय सामंत यांनी केला.