सिंधुदुर्ग - वनमंत्री संजय राठोड यांच्याविरोधात सिंधुदुर्ग भाजपा महिला आघाडी आक्रमक झाली आहे. कुडाळ भाजपा कार्यालयासमोरील चौकात महिला आघाडीच्यावतीने रास्तारोको करण्यात आला. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्या महिलांना ताब्यात घेतले.
जोरदार घोषणाबाजी
वनमंत्री संजय राठोड यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, यासाठी पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्याविरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपा महिला आघाडीच्यावतीने आज निदर्शने करण्यात आली. कुडाळ भाजपा कार्यालयासमोर रास्तारोको करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, वनमंत्री संजय राठोड यांच्याविरोधात भाजपा महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या महिला पदाधिकाऱ्यांनी यावेळी राठोड यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.