सिंधुदुर्ग - मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाचा ठेका मिळूनही ज्या ठेकेदारांनी अजूनही काम सुरू केलेले नाही. त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे संकेत केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत, अशी माहिती भाजपा प्रदेश सरचिटणीस प्रमोद जठार यांनी दिली.
काम न करणाऱ्या महामार्ग ठेकेदारांवर कारवाई होणार; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे संकेत - sindhudurg road problems
भाजपा प्रदेश सरचिटणीस प्रमोद जठार यांनी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सिंधुदुर्गपेक्षा रत्नागिरीत मुंबई-गोवा महामार्गाच्या समस्या जास्त असल्याची बाब समोर आणून दिली.

मुंबई-गोवा महामार्गाच्या समस्यांबाबत चिपळूण ते राजापूर असा रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा आपण केला. त्यानंतर सिंधुदुर्गपेक्षा रत्नागिरीत मुंबई-गोवा महामार्गाच्या समस्या जास्त असल्याची बाब समोर आली. त्यामुळे केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास संबधित बाब आणून देण्यात आली आहे. संगमेश्वर शहरात होत असलेले जास्तीचे भूसंपादन थांबवून पुन्हा पुलाचे आराखडे तयार करण्यात यावेत, अशी जनतेची मागणी आहे. यामुळे यासंबंधी निवेदन मंत्री नितीन गडकरी यांना देण्यात आले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गाचे जे कंत्राटदार निविदा मिळूनसुद्धा अजूनही काम सुरु करीत नाहीत त्यांची कामे त्वरित काढून घेऊन त्यांना जनतेच्या अडचणीत भर घातल्याबद्दल व सरकारी कामात दिरंगाई केल्याबद्ल दंड आकारण्यात यावा. आकारण्यात आलेला दंड जनकल्याणासाठी वापरावा, अशी मागणी गडकरी यांना केल्याचेही ते म्हणाले. तर याप्रकरणी मंत्री गडकरी यांनी आपण सुद्धा आता त्याच निष्कर्षास आलो आहे. दोन दिवसात आढावा बैठक घेऊन कारवाईचा दणका या कंत्राटदरांना देण्याचे संकेत, यावेळी दिले आहेत. तसेच संगमेश्वर शहरवासियांनाही न्याय देण्याचे त्यांनी सांगितले असल्याचे माहिती प्रमोद जठार यांनी दिली.