सिंधुदुर्ग - आगामी काळात कोकणातील शिवसेनेच्या सर्व 11 आमदारांना घरी बसवणार असल्याचा विश्वास भाजपा खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केला. शिवसेनेचे आमदार किती? असा सवाल लोक विचारतील म्हणून मुख्यमंत्री पिंजर्यातून बाहेर पडत नाहीत, असा टोला त्यांनी लगावला आहे.
कुडाळ येथे भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक खासदार राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. याबैठकीनंतर राणे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. माजीमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नीतेश राणे, माजी खासदार निलेश राणे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर, महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
...म्हणून मुख्यमंत्री पिंजर्यातून बाहेर पडत नाहीत! 'तो जिल्ह्यात येऊन काय काय करतो ते एक दिवस सांगेन' कोकणातील 11 आमदार विधानसभेत कधी कोकणातील विकासाबाबत बोलतात का? जाहीर केलेला फंड ही हे सरकार देत नाही. त्यामुळे हे आमदार काही करू शकत नाहीत,असे राणे म्हणाले. पालकमंत्री तर निष्क्रिय आहे, काही कामाचा नाही. तो जिल्ह्यात येऊन काय काय करतो ते एक दिवस सांगेन. मात्र आता आम्ही ठरवलय कोकणाचा विकास थांबता कामा नये. तो पूर्ववत चालू राहिला पाहिजे. विकासकामांनी निधी मिळणार नसल्यास भारतीय जनता पार्टी सरकार विरोधात आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा
कोण आहे तो? कोकणाचं काय माहिती आहे त्याला? महसुल राज्यमंत्र्याला काय अधिकार आहेत? महसूलमंत्री काँगेसचा आहे. या सेनेच्या राज्यमंत्र्याला कोण विचारतंय, असे राणे म्हणाले. मी ओळखतो त्याला. गेली चाळीस वर्ष तो अशोक चव्हाणांसोबत फिरायचा, असे राणे म्हणाले.
वैद्यकीय महाविद्यालयासाठी निधी कुठून आणणार
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणार अशी फक्त शिवसेनेने घोषणा केली. मात्र या वैद्यकीय महाविद्यालयासाठी जमीन कुठे? तसेच निधी कुठून देणार? याची तरतूद केली नाही. या महाविद्यालयाची परवानगी ही केंद्र सरकार देते. राज्य सरकार परवानगी नाही,असे राणे म्हणाले. जिल्ह्याला विकास निधी देऊ न शकणारे हे सरकार सुमारे 250 कोटी रुपयांचा निधी हॉस्पिटलला कसा काय देणार? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.