सिंधुदुर्ग - उदय सामंत उपरा पालकमंत्री आहेत. आमदार वैभव नाईक लॅब मंजूर करण्यात गुंतले आणि पालकमंत्री आपल्या मतदारसंघात 35 लाखांची अद्यावत विद्युत शवदाहिनी उभारण्यात गुंतले आहेत, असा आरोप भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी केला आहे. कणकवलीत ते बोलत होते. सरकार उच्च न्यायालयात म्हणते सर्वच ग्रामीण भागात कोरोना टेस्ट लॅब आवश्यक नाही ही बाब योग्य नाही. सिंधुदुर्गात आमच्या दबावाला झुकून लॅब मंजूर केली आहे. याबाबत केवळ मंजुरी पत्र दाखवू नका, 25 दिवसांच्या आत लॅब टेस्टला सुरुवात करा, असे जठार म्हणाले.
'रुग्ण मरत असताना उपरे पालकमंत्री मतदारसंघात विद्युत शवदाहिनी उभारण्यात दंग'
सिंधुदुर्गात आमच्या दबावाला झुकून लॅब मंजूर केली आहे. याबाबत केवळ मंजुरी पत्र दाखवू नका, 25 दिवसांच्या आत लॅब टेस्टला सुरुवात करा, असे जठार म्हणाले.
महिला मृत झाल्यानंतर 10 दिवसांनी कोरोना पॉझिटिव्ह अहवाल येतो. यातून प्रशासनातील गलथानपणा दिसून येतो. आम्ही सहकार्य करण्याच्या दृष्टीने पडवे येथे लॅब सुरू करायला सांगत होतो. आमच्या मनात कुठलाही हेतू नव्हता, असे स्पष्ट करताना जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत न्यायालयात जायचे बोलतात. त्यांचे सरकार असताना त्यांना ही भाषा शोभत नाही, असेही ते म्हणाले. कोकणातील ज्या माणसांचा मुंबईत दुर्दैवी मृत्यू झाला त्या सर्वांची जबाबदारी पालकमंत्री आणि ठाकरे सरकारची आहे. 25 दिवसात टेस्ट लॅब सुरू झाली नाही, तर एफआयआर दाखल करणार असल्याचेही जठार म्हणाले.