सिंधुदुर्ग - केंद्रातील भारतीय जनता पार्टीच्या सरकारने प्रस्तावित केलेल्या प्रकल्पांना शिवसेना विरोध करत आहे. त्यामध्ये नाणार नको, सी वर्ल्ड प्रकल्प नको, आयुर्वेदिक वनस्पती संशोधन केंद्र नको तर, ठाकरे सरकारला हवे काय? असा सवाल भाजपा प्रदेश सचिव आणि माजी आमदार प्रमोद जठार यांनी केला आहे.
कोकणाचा विकास कसा करायचा, हे शिवसेनेने जाहीर केले पाहिजे. कोणी जागा देता का जागा, कोकणातील प्रकल्पांना कोणी जागा देता का? असे म्हणण्याची वेळ केंद्र सरकारवर आली आहे. आता आणखी काय केले तर, केंद्राच्या या पर्यावरणपूरक आयुर्वेदिक वनस्पतीवर संशोधन प्रकल्पाला शिवसेना सरकार जागा देईल? हेच का ठाकरे सरकारचे कोकणावरचे प्रेम? असे सवाल जठार यांनी केले आहेत.
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक सिंधुदुर्गात प्रकल्प व्हावा, म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विनंती केली आहे. कोकणातील आमदारांच्या जीवावर उभे असलेले ठाकरे सरकारचे मंत्री, आयुर्वेदिक संशोधन प्रकल्प लातुरला पळवत आहेत, असा गंभीर आरोपही जठार यांनी यावेळी केला.