सिंधुदुर्ग- जिल्ह्यातील कोलमडलेल्या एसटी सेवेवरून भाजपने राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी एसटी सेवा सुरळीत न झाल्यास जिल्ह्यातील एसटी डेपो बंद आंदोलन छेडण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे. चुकीच्या धोरणामुळे ग्रामीण भागातील सेवा पूर्णपणे बंद पडली असून त्याचा परिणाम सामान्य माणसांना भोगावा लागत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
ठाकरे सरकारच्या चुकीच्या कारभारामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या अडचणीत वाढ होत आहे. जिल्ह्यातील ३०० एसटी चालक-वाहक मुंबईमध्ये ठाणा शहरात पाठविण्यात आले आहेत. त्यामध्ये वेंगुर्ले आगारातील ५२ चालक-वाहकांचा समावेश असून त्यामुळे ४५ पैकी केवळ ८ फेऱ्या सुरू आहेत. तर कणकवली आगारातून ८० चालक-वाहक गेल्याने ५० टक्के फेऱ्या बंद आहेत. एसटीचे कर्मचारी, चालक-वाहक मुंबईत पाठवल्याने नागरिकांना फार मोठा भुर्दंड ठाकरे सरकार घालत आहेत. ज्या कोकणामुळे सत्तेत बसलात त्याच्या मुळावर शिवसेना उठत आहे, असा आरोप भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केला. कणकवली येथील भारतीय जनता पक्ष जिल्हा कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.