सिंधुदुर्ग -अयोध्या येथील श्रीराम मंदिर पुनर्निर्माण भूमिपूजन सोहळ्यानिमित्त वेंगुर्ला शहरातील प्रसिद्ध श्रीराम मंदिरात भारतीय जनता पार्टी व विश्व हिंदू परिषद यांच्यामार्फत जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या उपस्थितीत महाआरती व घंटानाद करण्यात आला. यावेळी प्रभू रामचंद्र की जय, महाबली हनुमान की जय, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय अशा अनेक घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
सर्वप्रथम मंदिरातील श्रीराम, सितामाता, लक्ष्मण व हनुमान यांच्या मूर्तींना पुष्पहार अर्पण करून घोषणा देण्यात आल्या. यानंतर श्रीराम, गणपती यांच्या आरत्या, भजन, महाआरती व घंटानाद करण्यात आला. तसेच भगवी पताका मंदिरावर फडकवण्यात आली.
तालुक्यातील विश्व हिंदू परिषदेच्या ज्या कारसेवकांनी आंदोलनात सहभाग घेतला होता. त्यांचा भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, नगराध्यक्ष दिलीप गिरप, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाचिटणीस साईप्रसाद नाईक, नगरसेवक प्रशांत आपटे, नागेश गावडे, धर्मराज कांबळी, माजी नगरसेविका सुषमा प्रभूखानोलकर, महिला पदाधिकारी वृंदा गवंडळकर, माजी उपनगराध्यक्ष अभिषेक वेंगुर्लेकर, युवामोर्चा शहर अध्यक्ष प्रणव वायंगणकर, शेखर काणेकर, राहुल मोर्डेकर, नीलय नाईक, बबलू कुडतरकर, विश्व हिंदू परिषद कोकण प्रांत सेवा विभाग प्रमुख डॉ.राजन शिरसाट, वेंगुर्ला प्रखंड अध्यक्ष अरुण गोगटे, प्रखंडमंत्री आपा धोंड, प्रखंड सहमंत्री महेश वेंगुर्लेकर, मठमंदिर संपर्क प्रमुख अभिषेक वेंगुर्लेकर, समरसता प्रमुख महेश सावळ, महिला प्रमुख प्रतीक्षा जोशी यांच्यासहित ग्रामस्थ उपस्थित होते.
संपूर्ण विश्व ज्या क्षणाची वाट बघत होते तो ऐतिहासिक क्षण आला आहे. शेकडो वर्षांपूर्वी अयोध्येत जे राम जन्मस्थान होते ते सर्व जगाला महित होते. मात्र, मधल्या सर्व राजकारणात आपली असलेली अयोध्येची भूमी त्याठिकाणी स्वतंत्र होत नव्हती. खऱ्या अर्थाने सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर भाजप पक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेहनत घेऊन जे भूमिपूजन त्याठिकाणी केले आहे, त्याबद्दल संपूर्ण देशभरात आनंदाचे वातावरण आहे.जिल्हावासीयांनी या क्षणाचा आनंद घेतला असल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी यावेळी बोलताना सांगितले.