सिंधुदुर्ग - सेना भाजपची आगामी लोकसभा निवडणुकीसाठी युती झालेली आहे. त्यामुळे भाजपने ठाणे, पालघर, कल्याण, रायगड तसेच रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदार संघ शिवसेनेला सोडला आहे. यामुळे भाजप कार्यकर्त्यांना दाद मागायची कुठे हा प्रश्न निर्माण झाला आहे. भाजप पक्ष वाढणार कसा, अशा शब्दात मत व्यक्त करून भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेवर नाराजी व्यक्त केली.
सोमवारी भाजप जिल्हा कार्यकारिणीची बैठक कणकवली येथे पार पडली. यामध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा शिवसेनेला न देता भाजपने आपल्याकडे घ्यावी, असा सूर कार्यकर्त्यांमधून उमटला.
नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान व्हायचे असतील तर पक्षादेश आणि युतीचा धर्म पाळावाच लागेल, असे आवाहन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी भाजप कार्यकर्त्यांना केले. तसेच सिंधुदुर्गातील भाजप कार्यकर्त्यांच्या भावना मुख्यमत्र्यांपर्यंत पोचवू अशीही ग्वाही त्यांनी दिली.
भाजप जिल्हा कार्यकारिणीची महत्वाची बैठक येथील भगवती मंगल कार्यालयात पार पडली. यात राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांना संबोधित केले. यावेळी भाजप उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड, भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाळ माने, प्रदेश चिटणीस राजन तेली, माजी आमदार अजित गोगटे, अतुल काळसेकर, संदेश पारकर, अतुल रावराणे, राजश्री धुमाळे आदींसह जिल्ह्याच्या आठही तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी रवींद्र चव्हाण म्हणाले, मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचे असेल तर कार्यकर्त्यांनी संभ्रमात राहू नये. कार्यकर्ते संभ्रमात असतील तर जनताही संभ्रमात राहिल. तुमच्या भावना निश्चितपणे मुखमंत्र्यांपर्यंत पोचवू. मात्र, पक्षादेश पाळणे हे प्रत्येक भाजप कार्यकर्त्याचे कर्तव्य आहे.