सिंधुदुर्ग - देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात चांदा ते बांदा ही कोकणच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलेली योजना बंद करून राज्य सरकारने सिंधुरत्न समृद्धी योजना सुरू केली आहे. याबाबत भाजपा आक्रमक झाली असून ही योजना अत्यंत फसवी असल्याचा आरोप भाजपाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी केला आहे. सरकारने सिंधुदुर्गवासीयांची निव्वळ फसवणूक केल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
'ठाकरे सरकारने 98 कोटी ठाकरे मागे घेतले'
सिंधुरत्न समृद्धी योजनेत सिंधुदुर्गातून 75 कोटींचे सार्वजनिक हिताचे प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. फडणवीस सरकारच्या चांदा ते बांदा या योजनेतून सिंधुदुर्ग आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी 193 कोटींचा निधी दिला होता. त्यापैकी 101 कोटी खर्च झाले, तर 98 कोटी ठाकरे सरकारने मागे घेतले. सिंधुरत्न समृद्धी योजना फसवी आहे. सिंधुरत्न समृद्धी योजना म्हणजे नवीन बाटली आणि जुनी दारू असल्याची टीका भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केली.
'अर्थमंत्री अजित पवार यांनी चांदा ते बांदा योजना बासनात गुंडाळली'
शेतकरी, मच्छीमार, महिला बचतगट यांना रोजगारातून आर्थिक उन्नती देणे हा चांदा ते बांदा योजनेचा गाभा होता. मात्र अर्थमंत्री पवार यांनी ती योजना बासनात गुंडाळून सिंधुरत्न समृद्धी योजना आणली. मागील सव्वा वर्षात एकही रुपया खर्च केला नाही. रत्नसिंधु समृद्धी योजना म्हणजे नवीन बाटली जुनी दारू असल्याचा टोला तेली यांनी लगावला. पर्यटनवाढीला चालना न देता कोकणच्या विकासाला खीळ घालण्याचे काम ठाकरे सरकार करत आहे, असेही ते यावेळी म्हणाले. मागील सव्वा वर्षात जिल्ह्याचा आराखडा वाढण्याऐवजी कमी करण्यात आला. सन 2019-20मध्ये 200 कोटींचा आराखडा 143 कोटींवर आणला. त्यातही फक्त 33 टक्के निधी आला. हा निधी 47 कोटी 19 लाख होता. आलेल्या 33 टक्के निधींपैकी 25 टक्के म्हणजे 11 कोटी 79 लाख 75 हजार निधी कोविडसाठी राखीव ठेवण्यात आला. चांदा ते बांदा योजनेतील शिल्लक अखर्चित निधीही मागे घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
'कोकणावर शिवसेनेकडून अन्याय केला जात आहे'
ज्या कोकणाने शिवसेनेला सत्ता दिली त्या कोकणावर शिवसेना अन्याय करत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार अजून झाले नाहीत. कोरोना काळात नियुक्त कंत्राटी डॉक्टरांचे 6 महिने मानधन नाही. पालकमंत्र्यांचा प्रशासनावर अंकुश नाही.जि.प.निधी अखर्चित राहण्याला पालकमंत्री सामंत कारणीभूत असल्याची टीका तेली यांनी केली. सिंधुरत्न समृद्धी योजना फसवी आहे. या योजनेचा फायदा सिंधुदुर्ग वासीयांना होणार नाही. शासकीय मेडिकल कॉलेजला निधी आणणार कुठून? जिल्ह्यात आरोग्य विभागाची 536 पदे रिक्त आहेत. ती कधी भरणार? किमान काही पदे भरावीत. एनआरएचएममधील कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना कायम करा, अशी मागणीही तेली यांनी केली.