महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन हजार किलोमीटरचे रस्ते, देखभालीचा प्रश्‍न बनतोय गंभीर - Simdhudurg latest news

जिल्ह्यातील इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण रस्ते जिल्हा परिषद अंतर्गत येतात. या दोन्ही प्रकारचे रस्ते मिळून ५ हजार ८९५ किलोमीटर लांबीचे २ हजार ८३० रस्ते जिल्हा परिषद अंतर्गत सध्या वापरात आहेत. मात्र, या सध्या रस्त्यांची दूरवस्था झाली असून त्याच्या देखभालीचा प्रश्न गंभीर झाला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन हजार किलोमीटरचे रस्ते, देखभालीचा प्रश्‍न बनतोय गंभीर
सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन हजार किलोमीटरचे रस्ते, देखभालीचा प्रश्‍न बनतोय गंभीर

By

Published : Aug 24, 2020, 11:56 AM IST

सिंधुदुर्ग- जिल्ह्यात मुंबई-गोवा हा एकमेव राष्ट्रीय महामार्ग आहे. तालुक्‍यांना जोडणारे राज्य मार्ग आहेत. हे मार्ग जिल्हा परिषद अंतर्गत येत नाहीत. मात्र, जिल्ह्यातील इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण रस्ते जिल्हा परिषद अंतर्गत येतात. या दोन्ही प्रकारचे रस्ते मिळून ५ हजार ८९५ किलोमीटर लांबीचे २ हजार ८३० रस्ते जिल्हा परिषद अंतर्गत सध्या वापरात आहेत. मात्र, या सध्या रस्त्यांची दूरवस्था झाली असून त्यांच्या देखभालीचा प्रश्न गंभीर झाला आहे.

जिल्ह्यात ४३२ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायत क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या रस्त्यांना ग्रामीण मार्ग म्हणतात. तालुक्‍यातील महत्त्वाच्या भागांना जोडणाऱ्या रस्त्यांना इतर जिल्हा मार्ग म्हणतात. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण ६९४.६० किलोमीटर लांबीचे ७९ रस्ते आहेत. ५ हजार २०१ किलोमीटर लांबीचे २ हजार ७५१ ग्रामीण रस्ते आहेत. एवढ्या रस्त्याच्या माध्यमातून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील दळणवळणाचा भार उचलला जात आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा हा राज्यात सर्वात वेगळी भौगोलिक स्थिती व नैसर्गिक रचना असलेला जिल्हा आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्ते हे वळणा-वळणाचे आहेत. ते डोंगर कपारीतून जातात. जिल्ह्यातील ग्रामीण मार्ग हे पठारी भागात कमी असून ते डोंगरातून जात असल्याने या रस्त्याच्या एका बाजूला उतार भाग असतो. त्याच्याविरुद्ध बाजूला डोंगर, गटार असते. त्यामुळे या रस्त्यांना पाणी वाहून जाण्यासाठी मोरी म्हणजे पाईप टाकलेले छोटे ब्रीज असते. अशा प्रकारची वैशिष्ट्ये जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांबाबत आहेत.

जिल्ह्यातील ग्रामीण भागांत रस्त्याचे जाळे विणलेले आहे. तालुक्‍याच्या भागातून गावांत जाण्यासाठी रस्ते तयार आहेत. त्याचबरोबर गावातून प्रत्येक वाडीत जाण्यासाठीही रस्त्याचे जाळे आहे. वाडी-वाडीत जाणारे रस्ते हे ग्रामपंचायत मालकीचे असतात. त्यांच्यावर नियंत्रण ग्रामपंचायतींचे असते. मालकी ग्रामपंचायतची असली तरी जिल्हा परिषद बांधकाम विभाग जबाबदारी सांभाळत असतो. जिल्ह्यात सलग जास्त लांबीचे रस्ते कमी आहेत. ते कमीत कमी लांबीचे असतात. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रस्त्याची संख्या वाढली असून ती २ हजार ८३० एवढी आहे.

जिल्ह्यातील रस्ते दुरवस्थेचे प्रमाण सुद्धा जास्त आहे. याला प्रमुख कारण आहे पाऊस. जिल्ह्यात अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत जास्त पाऊस पडतो. पडलेल्या पावसाचे पाणी जमिनीत जीरत नाही. ते पाणी जमिनीवरुन वाहते. तसेच ते रस्त्यावरुन सुद्धा वाहते. रस्त्याच्या नजिक झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. पाऊस पडत असताना या झाडांच्या पानावरुन पाण्याचे थेंब पडतात. परिणामी रस्ते मोठ्या प्रमाणात खराब होतात. यावर्षी गणेशोत्सवापूर्वी पावसाने दरवर्षाची सरासरी पार केली आहे. त्यामुळे यावर्षी यावर्षी ग्रामीण भागातील रस्त्याची स्थिती अधिकच गंभीर बनली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details