सिंधुदुर्ग -प्रत्येकाच्या आयुष्यात स्वतःच घर कसं असावे हे एक स्वप्न असते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील मूळ भिरवंडे गावचे रहिवाशी असलेल्या प्रसाद सावंत यांनाही असेच एक स्वप्नवत घर आपल्या आईला भेट म्हणून द्यायचे होते आणि ते त्यांनी दिलेही. विशेष म्हणजे कोकणातील घर संस्कृतीला फाटा देणारे पिरॅमीड टाइप बिन छपराचे करंजे गावातील त्यांचे हे घर सध्या संपूर्ण कोकणात चर्चेचा विषय ठरले आहे.
कोकणची घर संस्कृती वेगळी
कोकण हा अति पर्जन्यमानाचा प्रांत म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी प्रामुख्याने जांभ्या दगडाची आणि उतरत्या कौलारू छपराची घरे बांधली जातात. अजूनही कोकणात मातीच्या भिंतीची घरे आहेत. कोकणातील वातावरणाशी जुळती मिळती हि घरे कोकणच्या वास्तुकलेची ओळखही आहे. सिमेंट संस्कृती आली आणि कोकणात स्लॅबची घरे, इमारती उभ्या राहू लागल्या, मात्र इथे धो-धो कोसळणाऱ्या पावसात छप्पर गळतीची समस्या उभी राहिली. मग छपरावर कौले बसविण्याची कल्पना कोकणी माणसाने अवलंबली. त्यामुळे कोकणात घर सिमेंटचे असले तरी स्लॅबवर कौले किंवा आता सिमेंट पत्र्याचे छप्पर दिसू लागले. कोकणची घर संस्कृती अशी बदलत असताना पिरॅमीड टाइप बर्फाळ प्रदेशातील घर आता कोकणात साकारले आहे.
आईला गिफ्ट म्हणून साकारलं आंख घर
बँकेत नोकरी करणाऱ्या प्रसाद सावंत यांनी आपल्या आईला काहीतरी वेगळी भेट द्यावी म्हणून हे अनोखे घर उभे केले असे ते सांगतात. आमची परिस्थिती तशी बेताचीच. वडिलांच्या आधाराने कसबस घर चालत होते. त्यानंतर आम्ही कर्ते झालो. सर्वकाही छान चालले असताना वडील आम्हाला सोडून गेले. गावाकडच्या आमच्या जुन्या घरात आई एकटीच राहत होती. वडिलांनंतर आईने आम्हाला बळ दिल, आत्मविश्वास दिला. माझ्या आयुष्यात आईचे योगदान मोठे आहे. त्यामुळे माझ्या आईला अनमोल अशी भेट द्यावी हा विचार माझ्या मनात होता. त्याच ध्येय्यातून मी हे घर साकारले, असे प्रसाद सावंत सांगितले आहे.