सिंधुदुर्ग - आमदार नितेश राणे ( MLA Nitesh Rane ) यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. संतोष परब यांच्यावरील हल्ल्यात अटकेची टांगती तलवार असलेल्या आमदार नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा उच्च न्यायालयात अॅड. राजेंद्र रावराणे यांच्या माध्यमातून धाव घेतली आहे. या अटकपूर्व जामिनावर पहिली सुनावणी 27 डिसेंबर रोजी होणार होती. याबाबत उद्या 28 डिसेंबर रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती अॅड. रावराणे यांनी दिली आहे.
हेही वाचा -Narayan Rane on Nitesh Ranes arrest : नितेश राणेंना अटक होणार? नारायण राणेंनीच दिले संकेत
आयपीसी 307 सारख्या गंभीर गुन्ह्यात आमदार नितेश राणे यांना अटकपूर्व जमीन जिल्हा न्यायालयात मंजूर होणार की, त्यासाठी उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागणार, हे चित्र उद्या 28 डिसेंम्बर रोजी स्पष्ट होणार आहे.
करंजेचे माजी सरपंच तथा शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आता कारवाईसाठीचे वातावरण तापू लागले आहे. राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संजीवकुमार सिंघल, कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या सहित वरिष्ठ अधिकारी कणकवलीत दाखल झाले होते. दरम्यान आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली असून, तपास सुरू असल्याचे सांगत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अधिक बोलण्यास नकार दिला.