सिंधुदुर्ग- जिल्ह्यात कातळशिल्पाच्या माध्यमातून अश्मयुगीन पाऊल खुनांचा ठोस पुरावा आढळू लागला आहे. मालवणनंतर आता देवगड तालुक्यातील साळशी गावच्या माळावर कातळशिल्प आढळून आले आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या साळशी गावच्या महत्त्वामध्ये त्यामुळे आणखीनच भर पडली आहे.
प्रागैतिहासिक काळातील सांस्कृतिक संदर्भ म्हणून कातळशिल्पांचे महत्त्व आहे. आदिमानवाने विविध शिल्पे दगडात कोरून ठेवलेली आहेत. ती कशाची चित्रे आहेत, त्यातून काय व्यक्त होते हे सांगणे अवघड आहे. विविध प्राणी, पक्षी अथवा काही अगम्य नक्षीकाम अशी ती खोदचित्रे गूढ आहेत. जगभरात अशा प्रकारच्या शिल्प किंवा चित्रांना राॅक आर्ट किंवा पेट्रोग्लिफ्स या नावाने ओळखले जाते. मुख्यत्वे लेण्यांच्या भिंतींवर केलेले कोरीव काम सर्वत्र आढळते; परंतु संपूर्णपणे उघड्यावर असलेल्या कातळावरील ही खोदचित्रे महाराष्ट्रात विशेषेकरून कोकणातच पाहण्यास मिळतात. कोकण भागात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, लांजा, राजापूर तसेच देवगड आणि सिंधुदुर्ग तालुक्यातील ५० गावांमध्ये अशी शिल्पे आहेत.
पावणाई देवीचे मंदिर ८३ खेड्यांचे अधिपती असलेले देवस्थान
साळशी गावाला ऐतिहासिक महत्व आहे. हे गाव आदिलशाहीपासून तालुक्याचे ठिकाण म्हणून ओळखले जात होते. स्वराज्यात सामील झाल्यानंतर या गावाचा दबदबा आणखीनच वाढला. याठिकाणचे पावणाई देवीचे मंदिर हे ८३ खेड्यांचे अधिपती असलेले देवस्थान म्हणून ओळखले जाते. मंदिराची भव्यदिव्यता इतिहासाच्या पार्श्वभूमीची साक्ष देतात. याशिवाय अनेक अशा ऐतिहासिक पाऊलखुणा या भागात सापडतात.