सिंधुदुर्ग :नारायण राणे यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज सिंधुदुर्गमध्ये आले होते. यावेळी उद्घाटनानंतर आपल्या भाषणामध्ये त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. जनमताचा अनादर करत, पवित्र युती सोडून शिवसेनेने सत्तेसाठी लाचार होत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले असे शाह यावेळी म्हणाले.
यावेळी त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा उल्लेख तीन चाकी 'ऑटोरिक्षा' सरकार असा केला. राज्यात तीन चाकी ऑटोरिक्षा सरकार तयार झाले असून, या ऑटोरिक्षाचे प्रत्येक चाक वेगवेगळ्या दिशेला जात आहे, असे शाह म्हणाले.
शिवसेनेने स्वार्थासाठी युती तोडली..
बाळासाहेब ठाकरे तर गेले, पण आता शिवसेनेचे नेते राजकारणासाठी तत्वांना तोडत आहेत. ते तत्वासाठी राजकारणात आलेले नसून राजकारणासाठी तत्व तोडणारे आहेत,अशा शब्दात अमित शहा यानी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. जनादेशाचा आदर न करता आम्ही वचन तोडलं असं खोटंनाटं सांगून आम्हाला बदनाम केलं आणि दगाबाजी केली. आम्ही जनादेशाचा अनादर केलेला नसून, त्यांनीच जनादेशाचा अनादर केला आणि सत्तेसाठी लाचारी पत्करली अशा शब्दात शहा यांनी शिवसेनावर हल्लाबोल केला.
शिवसेनेने महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर भाजपची बदनामी सुरू केली. मात्र, बिहारमध्ये आम्ही दिलेला शब्द पाळला होता. मी कधीही बंद दारामागे चर्चा करत नाही. शिवसेना ज्याप्रकारे वागली, तसे भाजपने केले असते तर आज राज्यात शिवसेनेचे अस्तित्व राहिले नसते असेही शाह म्हणाले.