सिंधुदुर्ग - तौक्ते वादळात ज्या लोकांचे नुकसान झाले आहे त्यांना लवकरच योग्य ती मदत मिळणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिली आहे. ते सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलत होते. कोकण आणि माझे नाते अतूट आहे. ते कोणीही तोडू शकत नाही असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवला.
वादळांच्या पार्श्वभूमीवर कायमस्वरूपी उपाययोजनेची गरज
नुकत्याच आलेल्या तौक्ते चक्रीवादळाने जिल्ह्यातअनेक भागात मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच पाहणी केली. येथील लोक गेली दोन, तीन वर्षे वादळांचा धोका अनुभवत आहेत. अशी वादळे यापूर्वी येथील किनारपट्टीवर आली नव्हती. मात्र, आता ती यायला लागली आहेत. या वादळांमुळे मोठे नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर कायमस्वरूपी आराखडा बनवत तो पूर्णत्वास घेऊन जाणे महत्त्वाचे असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. या योजनेसाठी पंतप्रधानांनी मंजूरी किंवा आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून द्यावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. चिपी विमानतळावर पत्रकारांशी ते बोलत होते. भूमिगत वीजवाहिन्या, धूपप्रतिबंधक बंधारा यासारख्या गोष्टी या कायमस्वरूपी करणे गरजेचे आहे. वादळाचा वेग, तीव्रता कमी करू शकत नाही. त्यामुळे नुकसान कमी कसे होईल यादृष्टीने ज्या काही उपाययोजना करणे गरजेचे आहे त्यादृष्टीने येत्या काळात प्रयत्न केले जातील. तसेच, पंचनाम्याचा येत्या दोन दिवसात अंतिम अहवाल मिळाल्यानंतर योग्य ती मदत जाहीर केली जाईल असे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले.
'लॉकडाउनमध्ये शिथिलता होऊ शकते'
लॉकडाउन कधीही उठू शकतो, पण आपण सर्वांनी करोनाच्या नियमांचं पालन करण्याची तयारी ठेवली पाहिजे, तर जेवढी रुग्णवाढ किंवा रुग्णसंख्या आहे, त्यातील ७० टक्के लोकांना लक्षणं नाहीत. तरीदेखील बेड कमी पडत आहेत. ती टक्केवारी वाढली तर काय होईल याचा विचार करा, अशी भीतीही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. लॉकडाउन कधीही उठू शकतो पण, आपण सर्वांनी करोनाच्या नियमांचं पालन करण्याची तयारी ठेवली पाहिजे. जागतिक आरोग्य संघटनेने लस मिळाल्यानंतरही मास्क घालणे गरजेचे असल्याचे सांगितले आहे. आपल्याला ही बंधने पाळणे अत्यावश्याक आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.