सिंधुदुर्ग- चालकाचा अचानक ताबा सुटल्याने मैद्याने भरलेला ट्रक करूळ घाटात खोल दरीत कोसळला. या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला. वैभववाडी पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल संदीप राठोड यांनी त्याला दरीतून बाहेर काढून त्याचे प्राण वाचवले. ही घटना आज संध्याकाळी चारच्या सुमारास घडली होती. ट्रक दोनशे फूट दरीत कोसळल्याने त्याचा चक्काचूर झाला आहे, तर मैद्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अपघाताची माहिती मिळताच करूळ चेक पोस्टवरती ड्युटीवर असलेले पोलीस कॉन्स्टेबल संदीप राठोड यांनी घटनास्थळ गाठले. क्षणाचाही विलंब न करता ते दरीत उतरले. त्यांनी जखमी अवस्थेत असलेल्या ट्रक चालकाच्या अंगावरील दगड हटवला व चालकाला दरीतून बाहेर काढले. मागील वर्षी देखील कॉन्स्टेबल राठोड यांनी दरीत अडकलेल्या एका ट्रक चालकाला मोठ्या शिताफीने बाहेर काढले होते.