सिंधुदुर्ग- जिल्हा कारागृहाच्या सावंतवाडी तालुक्यातील, कोलगाव आयटीआयमधील कोरोना विलगीकरण केंद्रातून फरार झालेला कैदी प्रमोद मधुकर परब याला पकडण्यात सलग चौथ्या दिवशीही पोलीस अपयशी ठरले आहेत. कैदी आपल्या कसाल पडवे या गावी असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाकडून पडवे येथील जंगलात जोरदार शोध मोहीम राबविण्यात आली. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. शुक्रवारीही मोहीम कायम ठेवण्यात येणार आहे अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
पोलिसांकडून घेतला जातोय कसून शोध
आरोपी प्रमोद परब याच्यावर लैंगिक अत्याचार प्रकरणी पाॅस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे. सोमवारी पहाटे कोलगाव आयटीआय इमारतीच्या खिडकीचा लोखंडी गज उचकटून बेडशीटच्या सहाय्याने, दहा ते पंंधरा फूटांवरून उडी घेत तो फरार झाला. या घटनेला चार दिवस झाले, मात्र अद्यापही पोलिसांना आरोपी आढळून आलेला नाही. दरम्यान, तो आपल्या गावी पोहोचण्याचा सुगावा पोलिसांना लागला. तो जंगलात लपून बसला असावा, या शक्यतेने तेथील जंगलात त्याचा शोध घेण्यात आला. मात्र, यातून काहीच हाती आले नाही. दरम्यान, कुडाळच्या दिशेने रस्त्यानजिकचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावरही पोलिसांना काहीच आढळून आले नाही, असे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक अण्णासो बाबर यांनी सांगितले.